केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय; स्फोटामागे डॉक्टरचा हात; फरिदाबाद टेरर मॉड्यूलशी संबंध
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाच्या तपासाबाबत काल केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला असून, या स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) कडे सोपवला आहे. त्यामुळे आता एनआयए या प्रकरणाचा पुढील तपास करेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्यांच्या निवासस्थानी या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. सकाळी 11 वाजता बैठक सुरू झाली. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. या बैठकीत कार स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक, दिल्ली पोलीस आयुक्त आणि एनआयएचे महासंचालक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे डीजीपी व्हर्चुअली या बैठकीत सहभागी झाले.
डॉक्टर स्फोटाचा सूत्रधार
दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा स्फोट आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता आहे. फरिदाबाद मॉड्यूलच्या अटकेची माहिती मिळताच संशयित डॉ. मोहम्मद उमर नबी याने आत्मघाती हल्ल्याची योजना आखल्याचे तपासात उघड झाले आहे. तपासात उमरचा फरिदाबाद टेरर मॉड्यूलशी संबंध असल्याचे देखील दिसून आले आहे.
सोमवारी संध्याकाळी 6.52 वाजताच्या स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात लाल किल्ल्याजवळील सुनेहरी मशिदीजवळ कार पार्क केलेली दिसते, जिथे ती सुमारे तीन तास उभी होती. यानंतर लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ कारमध्ये स्फोट
झाला होता.
डॉ. मोहम्मद उमर कोण आहे?
उमर हा हरियाणातील फरीदाबाद येथील अल फला मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. तपास यंत्रणांना संशय आहे की, तो फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला गेला आहे. उमर हा अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉ. आदिल अहमद राथेरचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले जाते. ज्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात
आली होती.
भूतानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजले
राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यातच पंतप्रधान 2 दिवसीय भूतान दौऱ्यावर गेले आहेत. भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी मोदी गेले आहेत. मात्र दिल्लीतील स्फोटावरून भूतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच गरजले. दिल्लीतील या घटनेने सर्वांचे मन व्यथित आहे. मी पीडित कुटुंबाचे दु:ख जाणतो, आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे. दिल्ली स्फोटातील दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. आमच्या तपास यंत्रणा या घटनेच्या मुळाशी जातील. या घटनेमागील षड्यंत्रकाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे त्यांनी इशारा दिला.

