दिल्लीतील कार स्फोट हा दहशतवादी हल्लाच : केंद्र सरकार

0
3

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर; तपास यंत्रणांना कारवाईचे निर्देश

केंद्र सरकारने दिल्लीतील कार बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून मान्यता दिली आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याविषयीचा एक ठराव मंजूर करण्यात आला.

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाची दखल घेत केंद्रीय मंत्रिमंडळाने काल निषेधाचा ठराव संमत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केंद्रीय कॅबिनेटची बैठक संपन्न झाली. या बैठकीत दिल्लीतील भीषण स्फोटासंदर्भात कठोर निषेध करणारा आणि मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत संमत ठरावाचे पत्रकार परिषदेत वाचन केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने या दहशतवादी घटनेचे वर्णन राष्ट्रविरोधी शक्तींनी केलेले घृणास्पद कृत्य असे केले आहे. तसेच तपास यंत्रणांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहशतवादाविरुद्ध सरकारचे शून्य-सहिष्णुतेचे धोरण आहे. तसेच, या स्फोटाचा सखोल तपास करून कट रचणारे, त्यावर अंमल करणारे आणि त्यांचे पाठीराखे शोधले जातील, असा निर्धार बैठकीत करण्यात आला. दरम्यान, दिल्ली स्फोट तपास कामावर सर्वोच्च शासकीय पातळीवरून लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली.

दिल्ली स्फोटातील डॉक्टरची
दुसरी कार सापडली हरियाणात

दिल्ली बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांकडे एक नाही तर दोन कार असल्याचा पोलिसांना संशय होता. डॉ. मोहम्मद उमर नबी याच्या दुसऱ्या एका कारचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. तपासादरम्यान हरियाणा पोलिसांना ही लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार काल अखेर सापडली. ही कार हरियाणातील खांडवली गावातील एका फार्महाऊसवर सापडली.

ही कार नबी याच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी ही कार शोधून काढण्यासाठी काल दुपारी अनेक राज्यांत अलर्ट जारी केला होता. हरयाणाच्या फरिदाबाद पोलिसांनी दिल्ली बॉम्बस्फोटातील उमर नबी याची दुसरी कार शोधून काढली. ही तीच लाल इकोस्पोर्ट कार आहे, जिचा नोंदणी क्रमांक डीएल-10-सीके-0458 आहे. ही कार खंडावली गावाजवळ पार्क केलेली आढळली. विशेष म्हणजे ही कार देखील उमर नबीच्या नावावर नोंदणीकृत आहे, जो या कारचा दुसरा मालक आहे. उमरने कार खरेदी करताना खोट्या पत्त्याचा वापर केला. त्याने कागदपत्रांमध्ये उत्तर दिल्लीच्या एका घराचा पत्ता दिला. आणखी एक योगायोग म्हणजे या गाडीचाही पहिला मालक देवेंद्र आहे. ज्या आय-20 कारमध्ये स्फोट झाला होता, त्या कारच्या पहिल्या मालकाचे नावही देवेंद्र आहे. पोलीस आता ही तोच देवेंद्र आहे की, आणखी कोणी याची पडताळणी करत आहेत.

भूतान दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधानांनी घेतली जखमींची भेट
दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर भूतानच्या राजाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काल देशात परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावरून थेट एलएनजेपी रुग्णालयात गेले. त्यांनी जखमींवर उपचारांचा आढावा घेतला आणि डॉक्टरांशी संवाद साधला. या कटासाठी जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले.