आमदार दिगंबर कामत यांच्या नावे दिगंबर कामत जी या नावाने एक बनावट फेसबूक खाते तयार करण्यात आले आहे. या प्रकरणी मडगाव पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. सायबर गुन्हा शाखेने तपास सुरू केला आहे. संबंधित गुन्हेगाराचा शोध लागेल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी खात्री आमदार कामत यांनी व्यक्त केली आहे. या फेसबूकवर दिगंबर कामत, मडगावचे आमदार व गोव्याचे माजी मुख्यमंत्री असे भासवले गेले आहे. या बनावट खात्यातून काहीं व्यक्तीना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून खासगी मेसेज करून त्यांचे मोबाईल क्रमांक मागविण्यात आले आहेत. हा प्रकार त्यांच्या नावाचा गैरवापर करून लोकांची दिशाभूल करण्याचा व राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रकार असल्याचे कामत यांच्या कार्यालयातून कळवण्यात आले आहे. याच्याशी दिगंबर कामत यांचा कोणताही संबंध नाही व त्यांनी फेसबूक खाते तयारही केलेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

