राज्यातील खाण घोटाळ्याची चौकशी करणार्या एसआयटीसमोर माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी शुक्रवारी हजेरी लावली. एसआयटीच्या अधिकार्यांनी कामत यांची तीन तास विविध प्रश्न विचारून चौकशी केली.
खाण घोटाळ्याची चौकशी करणार्या एसआयटीने माजी मुख्यमंत्री कामत यांना २१ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने कामत यांनी खास न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. खास न्यायालयाने कामत यांना अंतिरीम जामीन मंजूर केला आहे. कामत तब्येत ठीक नसल्याने मंगळवारी चौकशीसाठी उपस्थित राहीले नाहीत. त्यांनी शुक्रवारी चौकशीसाठी उपस्थित राहू ,असे एसआयटीला कळविले होते.
रायबंदर येथील एसआयटीच्या कार्यालयात कामत यांनी सकाळी ११ च्या सुमारास उपस्थित राहीले. खाण घोटाळ्यातील चाळीस लीज प्रकरणात कामत यांची चौकशी केली जात आहे. कामत यांच्या कार्यकाळात मुदत संपलेल्या लीजचे नूतनीकरण करण्यात आले आहे. एसआयटीच्या अधिकार्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण उत्तरे दिली आहेत, असे कामत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, याच आठवड्यात कामत यांचे पुत्र योगीराज कामत यांची दोन तास चौकशी केली आहे. तसेच कामत यांच्या एका नातेवाईकाची सुध्दा चौकशी करण्यात आली आहे. खाण घोटाळा प्रकरणातील कागदपत्रांची तपासणी करून संबंधितांना प्रश्न विचारले जात आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

