दिखाऊ प्राणीप्रेमाला रोखठोकपणे फटकारत सर्वोच्च न्यायालयाने काल दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचे सहा आठवड्यांच्या आत निर्बीजीकरण करून त्यांना निवाऱ्यांत हलवा असा आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. कोणी प्राणीप्रेमाच्या बहाण्याने ह्यात अडथळा आणायचा प्रयत्न केला तर त्यालाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा बडगाही सर्वोच्च न्यायालयाने ह्या निवाड्यात उगारला आहे. भटक्या कुत्र्यांसाठी दिल्ली महानगरपालिकेने जागा निर्धारित केली असताना प्राणीप्रेमी संघटनेने त्याला स्थगिती आदेश मिळवून त्या प्रयत्नांत खो घातला होता, त्याची ह्या कठोर निवाड्याला पार्श्वभूमी आहे. रॅबीजने ज्या मुलांचा प्राण गेला, त्यांना हे प्राणीप्रेमी परत आणणार आहेत का, असा सवालही सन्माननीय न्यायालयाने केला आहे. आपल्या प्राणीप्रेमाचा देखावा चारचौघांत करण्याची बऱ्याचजणांना खोड असते. आपल्या घरचे उष्टे खरकटे आणून भटक्या कुत्र्या-मांजरांना, गुराढोरांना सार्वजनिक ठिकाणी टाकून आपल्याला प्राण्यांची किती काळजी आहे हे समाजाला दाखवण्यासाठी धडपडणारी ही मंडळी ह्या भटक्या प्राण्यांना स्वतःच्या घरी नेऊन त्यांचे पालनपोषण करायला मात्र तयार नसते. अनेकदा ही ‘प्राणीप्रेमी’ म्हणवणारी माणसे स्वतः मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा एकाकी असतात आणि स्वतःच्या त्या व्यथेवर उतारा म्हणूनही हे अतिरेकी प्राणीप्रेम दर्शवीत असतात. आपल्या ह्या कृत्यामुळे आम नागरिकांना किती त्रास होतो, त्यांच्या सार्वजनिक वावराला किती धोका पोहोचतो ह्याचा विचार करण्याची गरजही ह्या मंडळींना वाटत नाही. ह्या दिखाऊ प्राणीप्रेमामुळे भारतातील शहरांमध्ये रस्तोरस्ती भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांना, वृद्धांना मुख्यत्वे सोसावा लागतो. कुत्रे चावण्याचे प्रमाण भारतात फार मोठे आहे. कुत्रा चावल्याने रॅबीज होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचे जे जागतिक प्रमाण आहे, त्यातील तब्बल 36 टक्के हे केवळ भारतातील आहे. भारतातील कोणत्याही शहरात जा, भटक्या कुत्र्यांचे तांडे सार्वजनिक जनजीवनाला धोका पोहोचवत मुक्तपणे फिरताना दिसतात. आपला गोवा देखील ह्याला अपवाद नाही. भटक्या कुत्र्यांमुळे, भटक्या गुरांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण देखील गोव्यात मोठे आहे. कुत्रा चावण्याच्या घटना तर सातत्याने घडत असतात. त्यामुळे राज्य सरकारला कुत्र्यांच्या विदेशी व हिंस्त्र प्रजाती पाळण्यावर देखील बंदी घालावी लागली आहे. मिशन रॅबीजसारखी मोहीम राबवण्यावर गोवा सरकार लाखो रुपये खर्च करीत असते, परंतु आज राज्यातील कोणतेही शहर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त नाही आणि त्यांचा उपद्रव वाढताच राहिला आहे. ह्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा कालचा निवाडा जरी दिल्लीपुरता असला, तरीही तो सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. दिल्लीमध्ये गेल्या जानेवारीपासून जूनपर्यंत पस्तीस हजारांहून अधिक लोकांना कुत्रे चावण्याच्या घटना घडल्या. त्यापैकी 49 जणांना रॅबीज झाला. दरवर्षी रॅबीजमुळे साठ हजार लोक मृत्युमुखी पडत असतात. ह्या सगळ्या आकडेवारीचा विचार करता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा महत्त्वाचा ठरतो. रस्त्यावर भटकणारी कुत्री, गुरेढोरे यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका तर पोहोचतोच, परंतु शहरांचे विद्रुपीकरणही होत असते. स्थानिक नागरिकांबरोबरच प्रवासी आणि पर्यटकांसाठी देखील भटक्या प्राण्यांचे हे तांडे तापदायक ठरत असतात. शहरांमध्ये अस्वच्छता निर्माण करण्यात ह्या भटक्या प्राण्यांचा मोठा वाटा असतो. कचराकुंड्यांतील कचरा इतस्ततः फेकून शहरे गलीच्छ करण्यातही त्यांचा हातभार असतो. त्यामुळे ज्याला प्राणीप्रेमाचे उमाळे असतील त्यांनी ही भटकी कुत्री जरूर आपल्या घरी घेऊन जावीत आणि त्यांना खाऊपिऊ घालून त्यांची काळजी वहावी, परंतु सार्वजनिक ठिकाणी त्यांचे लाडकोड पुरवून त्यांचा इतरांना उपद्रव देण्याचा ह्या लोकांना काय अधिकार? सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने ह्या ढोंगालाच सुरूंग लावला आहे. मुंबईत सध्या कबुतरखान्याचा वाद उफाळला आहे. कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनाचे, घशाचे विकार होऊ शकतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले असताना स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी त्यांना दाणे टाकून इतरांच्या आरोग्याशी खेळण्याचा जो काही प्रकार चालतो, त्याला न्यायालयाने नुकताच चाप लगावला. प्राणीप्रेम जरूर असावे, परंतु त्याचा एवढाही अतिरेक होऊ नये की मानवी आरोग्यालाच त्यापासून धोका पोहोचेल. शेवटी मानव आणि प्राणी यांचे सहअस्तित्व आपल्या परंपरेनेच सांगितलेले आहे. परंतु हे प्राणीप्रेम जेव्हा रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी प्रकटते तेव्हा ते निश्चितपणे उपद्रवकारक ठरते. हा उपद्रव दूर करण्यात गैर काय?

