दा. अ. कारे यांच्या आठवणी

0
42
  • रामनाथ दा. कारे

शेवटच्या परीक्षेत बाबांचे म्हणजे दामोदर अच्युत कारे यांचे यश फार मोठे होते. त्यावेळच्या गोव्याच्या गव्हर्नरने बाबांना बक्षीस म्हणून एक फावरल्युबा मनगटी घड्याळ आणि त्यावेळचे प्रसिद्ध ब्रँड कोंकलीन पेन दिले होते. हे घड्याळ ते पुष्कळ वर्षे वापरत, याला मी स्वतः साक्षीदार आहे.

19 डिसेंबर 2020 रोजी गोवा मुक्तीला 60 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गोवा सरकारने सोहळा साजरा केला. त्यासाठी खुद्द राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद खास दिल्लीहून गोव्याला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी सोहळ्याच्या सुरुवातीला ‘स्मरुनी गोमंत देवी मूर्ति सौख्यदा’ हे गीत सादर करण्यात आले. तसे हे गीत गोव्यातल्या कुठल्याही समारंभाच्या सुरुवातीला म्हटले जाते. मला अभिमान वाटतो, हे गीत लिहिणाऱ्या दामोदर अच्युत कारे यांचा मी मुलगा आहे.

बाबांना लोक ओळखायचे ते मुख्यतः कवी म्हणून. पण त्यांच्या व्यक्तित्वात इतरही पैलू होते. समाजाशी बांधिलकी असलेली व्यक्ती अशीही त्यांची ख्याती होती. त्यामुळे त्यांना व्याख्यानासाठी गोव्यात तसेच इतर ठिकाणी बोलावले जात असे.
एका वर्षी त्यांना मुंबई येथील गोमंतकीय लोकांच्या जुन्या ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या ख्यातनाम संस्थेने बोलावले. त्यात त्यांचा सत्कारही करायचा होता. तो सत्कार कशासाठी होता हे मला आठवत नाही. ठरल्या दिवशी सत्कार पार पडला. त्यांच्याबद्दल उचित भाषणेही झाली. समारोपाच्या वेळी त्यांना एक धनादेश देण्यात आला.

निघता निघता बाबांनी त्यातली रक्कम बघितली आणि लगेचच त्या संस्थेच्या विश्वस्तांना ती परत केली. त्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले की, या रकमेतून येणाऱ्या उत्पन्नातून एस.एस.सी. परीक्षेत मराठी विषयात उत्तम गुण मिळविणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्याला दरवर्षी पारितोषिक द्यावे. हे पारितोषिक त्यांच्या आई स्व. इंदिराबाई अ. कारे यांच्या नावाने द्यावे असेही त्यांनी सांगितले. ते तसे देत असल्याचे दरवर्षी ती संस्था विद्यार्थ्याच्या नावासह कळवत असे. बाबांच्या निधनानंतर ते आमच्या आईला कळवण्यात येत असे. दरम्यानच्या काळात मी मुंबईत स्थायिक होतो. मडगावला येत-जात असलो तरी एकावेळी आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहत नसे. आईला ज्यावेळी असे वाटले की, माझ्या मुंबईच्या पत्त्यावर ही माहिती जावी, तेव्हा तिने तसे मला सुचवले आणि मीही आनंदाने मान्य केले. पहिल्याच वर्षी ही माहिती माझ्याकडे आली, त्यावेळी माझा थोडा भ्रमनिरास झाला, कारण ती रक्कम केवळ रू. 1000 होती. पुढे ही रक्कम वाढवून मी रू. 6000 केली.

माझ्या बाबांना एक बहीणही होती हे बऱ्याच जणांना माहीत नाही. खुद्द आमच्या कुटुंबातसुद्धा ही गोष्ट फारच थोड्या लोकांना माहीत होती. मलाही तिचे नाव काय, पुढे सांगितलेल्या घटना कधी, कुठल्या साली घडल्या हेही माहीत नव्हते. बाबांनी स्वतः होऊन याची वाच्यता कधी केली नाही.
ही बहीण लग्न करून मडकईतील कामत घराण्यात दिली होती. आईने सांगितले त्याप्रमाणे तिचा सासरी अमानुष छळ झाला. आईने सांगितलेल्या गोष्टी ऐकून माझा थरकाप झाला होता. ते सर्व इथे शब्दांत उतरवणे शक्य नाही. अन्‌‍ सासरच्या मंडळींनी केलेल्या छळातच तिचा मृत्यू झाला. याचे दुःख बाबांना बरीच वर्षे सतावत होते. बाबा नास्तिक होते हे सगळ्यांना माहीत होते. मी त्या नास्तिकतेचा संबंध या मृत्यूशी जोडतो. पुष्कळ लोकांना ते पटत नाही. त्यांच्या मते बाबा बुद्धिप्रामाण्यवादी होते. देव असणे हे त्यांच्या संकल्पनेत बसत नव्हते. पण ही गोष्ट कधी बाबांकडून चर्चेत आली नाही.
माझ्या आयुष्यात ‘ती’ घटना अचानक समोर आली. मी 1981 पासून मुंबईला नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झालो होतो. माझे वास्तव्य विलेपार्लेमधील गोमंतक सोसायटीमध्ये (महंत रोड) होते. जवळच गोमंतक सेवा संघ ही सेवाभावी संस्था लग्नाचा हॉल चालवत होती. हॉलबरोबर वाचनालय, वैद्यकीय सेवा असे दुसरेही उपक्रम चालायचे.

या संघाचे दरवर्षी दिवाळीच्या आसपास स्नेहभोजन असायचे. संघाचे सदस्य बहुतेक गोमंतकीय- मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारे या पर्वाला उपस्थित राहत. अशाच एका स्नेहभोजनात सन 1992-93 साली माझी एम. व्ही. कामत यांच्याशी भेट झाली. त्यांनी ओळख करून दिल्यावर माझे नाव ऐकून पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशी- “अरे, तुम्ही तर आमचे नातेवाईक आहात.” थोडा वेळ मी अचंब्यात पडलो. पण त्यांनी लगेच स्पष्टीकरण दिले. त्यांनी सुरुवात केली, ती क्षमा मागण्यापासून. त्यांनी आवर्जून सांगितले की, आम्हाला आमच्या मागच्या पिढीचा हा प्रकार कधीच आवडला नाही. पण त्यांचा जन्म हा पुष्कळ नंतर झाला. ते या परिस्थितीत काहीच बदल करू शकत नव्हते, म्हणून ते क्षमायाचना करत होते. त्यांनी बोलता-बोलता असाही प्रस्ताव ठेवला की, आपण मागचे सारे विसरून नव्याने संबंध प्रस्थापित करूया. माझी हरकत नसली तर आपण घरोबा सुरुवात करूया. त्यांचे बंधूही याला नाही म्हणणार नाहीत. त्यांचे हे बंधू पी. व्ही. कामत इंजिनिअर होते, पण ते त्यावेळी उपस्थित नव्हते. मी लगेच प्रत्युत्तर दिले नाही. बाबा 1985 साली गेले होते. मी आईचा या बाबतीत सल्ला घेतला. तिनेही काही ठाम उत्तर दिले नाही, त्यामुळे मलाच निर्णय घ्यावा लागला. मी कामतांशी पुढे संपर्क ठेवला नाही. बाबांचा याबाबतीत काय विचार राहिला असता सांगता येत नाही. तरीसुद्धा त्या माझ्या मी न बघितलेल्या आत्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हा संबंध मी टाळला.
काही वर्षांपूर्वी गोवा सरकारच्या गोवा मराठी अकादमीने ‘नन्दादीप’ कवितासंग्रहाचे पुनर्प्रकाशन केले. खरे म्हणजे हे पुस्तक 4 एप्रिल 2019 ला गोमंत विद्यानिकेतनात झालेल्या समारंभात प्रसिद्ध करण्यात आले होते. मलाही त्याच्या चार-पाच प्रती मिळाल्या होत्या. पण का न जाणे, माझ्यापाशी त्या तशाच पडून होत्या. पुढे 9 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबईत कोरोना महामारीचा क्षोभ वाढल्याने आणि माझ्या व्यवसायातही माझ्या उपस्थितीची विशेष गरज नसल्याने मी मडगावला स्थायिक व्हायचे ठरवले. पण निघताना पुष्कळशा गोष्टी- ज्यामध्ये ही पुस्तकेही होती- न घेताच मी निघालो होतो. महामारीचा प्रक्षोभ एवढा होता की आम्ही 24 सप्टेंबर 2021 पर्यंत परत मुंबईला जाऊ शकलो नाही. नंतर गेलो तेव्हा ज्या गोष्टी पहिल्यावेळी विसरलो होतो, त्या आठवणीने आणल्या. त्यात ‘नन्दादीप’च्या प्रतीही होत्या.
त्या पुस्तकाच्या वाचनातून माझ्या प्रकर्षाने लक्षात आले की, बाबांचे शिक्षण लिसेंवच्या 3 वर्षांपर्यंतच झाले असे सर्वांना वाटते. किंबहुना माझे कनिष्ठ बंधू दिलीप यांनी पण त्यालाच दुजोरा दिला आहे, परंतु माझ्या पक्क्या माहितीप्रमाणे आणि आईने सांगितल्याप्रमाणे बाबा लिसेंवच्या 5 वर्षेपर्यंत शिकले होते. अजून एक गोष्ट तिने सांगितली होती. ती म्हणजे, शेवटच्या परीक्षेत त्यांचे यश फार मोठे होते, इतके की त्यावेळच्या गोव्याच्या गव्हर्नरने बाबांना बक्षीस म्हणून एक फावरल्युबा मनगटी घड्याळ आणि त्यावेळचे प्रसिद्ध ब्रँड कोंकलीन पेन दिले होते. हे घड्याळ ते पुष्कळ वर्षे वापरत होते, याला मी स्वतः साक्षीदार आहे.

ज्यावेळी माझे सर्व बंधू या ना त्या कारणाने मुंबईत होते, त्या काळात मी बाबांच्या सान्निध्यात होतो.
मी माझा सी.ए. चा अभ्यासक्रम पूर्ण करून व्यवसाय सुरू करायला मडगावला आलो होतो. त्यांच्या बुद्धिमत्तेचा वारसा आम्हा सर्व मुलांना भरभरून मिळाला यात वादच नाही. आम्ही सगळे आपापल्या परीने आणि कुवतीनुसार शाळा-कॉलेजमध्ये यश मिळवत गेलो. पण एक गोष्ट जरूर नमूद करावीशी वाटते की, हे शाळा-कॉलेजमधले यश म्हणजे सर्व काही नाही! विशेषतः पुढील जीवनात ते कामाला येईलच असे नाही, हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. आमचे आजोबा- जे आम्हा सर्वांच्या घडणीचे उगमस्थान होते- ते अच्युत कारे त्यांच्या हयातीत सुप्रसिद्ध होते. आजच्या पिढीला हे नाव नक्कीच अपरिचित असेल. आणि त्यांचीच पुण्याई आम्हाला बळ देत आहे.
पुष्कळशा घरात मुलांना एकाहून अधिक नावे असतात. आम्ही पाच भावंडे. मोठी बहीण आणि नंतर चार भाऊ. आमच्यापैकी तिघा भावांना दोन-दोन नावे आहेत. तसे बहिणीलाही दुसरे नाव होते. पण ते क्वचितच वापरले जात असे. आम्ही भाऊच त्या नावाने लहानपणी तिला चिडवत असू. इतर कोणालाही ते माहीत नव्हते. मोठा भाऊ अच्युत. हे आमच्या आजोबांचे नाव. पहिल्या मुलाला नेहमीप्रमाणे आजोबांचे नाव ठेवले जायचे. कागदोपत्री हे नाव वापरले जात असे. पण घरी, शेजारी आणि जवळच्या नातेवाईकांना तो ‘उल्हास’ म्हणून माहीत होता. पण हे उल्हास नाव कुठून आले ते मी सांगू शकत नाही. मी रामनाथ. श्री रामनाथहे कारे घराण्याचे कुलदैवत. तसे कारे मंडळी रामनाथीला जातात तेव्हा प्रथम दर्शन कामाक्षीदेवीचे घेतात. मडगावला एकूण तीन रामनाथ कारे आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या जागी प्रस्थापित आहेत. त्यांपैकी एक सालसेत फार्मसी समूहाचे प्रमुख आहेत. दुसरे रामनाथ कारे उद्योगसमूहाचे प्रमुख आहेत. हे दोघेही मडगावमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. तिसरा मी. मी मडगावात लहानाचा मोठा झालो. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर मला मुंबईला जाणे भाग होते, कारण 1960 मध्ये पदवी शिक्षणाची येथे सोय नव्हती म्हणून मी सात वर्षे मुंबईत घालवली.

मी सी.ए. म्हणून काम केले. पण विधिलिखित असे होते की, फार थोड्या वेळात मला मुंबईला परत जावे लागले. मूळ मुद्द्यावर यायचे तर माझे दुसरे नाव श्रीकांत. हे नाव माझ्या बाबांनी आवडीने ठेवले होते. ‘श्रीकांत’ ही शरच्चंद्र चटर्जी यांनी लिहिलेली एक प्रसिद्ध कादंबरी. ती जरी ‘देवदास’इतकी प्रसिद्ध नसली तरी चांगलीच नावाजली होती. त्या कादंबरीतले प्रमुख पात्र ‘श्रीकांत’ याचेच नाव मला ठेवले होते.
माझ्या मागचा जयप्रकाश. त्याला दुसरे नाव देणारा कोणी भेटला नाही. धाकटा दिलीप. त्याचे नाव ‘अरुण’ असे उल्हासने ठेवले. हे नाव आमच्या शेजारच्या बड्या घरातील नातवाचे होते. ते नाव उल्हासला फार आवडले होते. यात आणखी एक वेगळा दृष्टिकोन म्हणजे माझ्या आईचे नाव. ते माहेरचे तुळशी बदलून लक्ष्मीबाई असे बाबांनी ठेवले. ते नाव त्यावेळच्या ‘स्मृतिचित्रे’ या प्रसिद्ध ग्रंथाच्या लेखिकेवरून तर ठेवले गेले नसावे?
मी 1960 मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला गेलो. माझा प्रवेश पोद्दार कॉमर्स कॉलेजमध्ये झाला. मी राहायला कॉलेजच्या माटुंगा हॉस्टेलमध्ये होतो. त्यावेळी गोव्याचे पुकळ विद्यार्थी मुंबईत असायचे. कारण उच्च शिक्षणाची सोय त्यावेळी गोव्यात नव्हती. माझे माध्यम मराठी होते. तरीसुद्धा मी इंग्लिश माध्यमातून जुळवून घेतले होते. इंटरमीजीएटमध्ये ते छान जमले होते. हॉस्टेलमध्ये गोव्यातील पुकळ विद्यार्थी होते. यांपैकी एक देविदास बोरकर याच्याशी माझी विशेष मैत्री होती. त्याचे कारण म्हणजे, तो एक अतिशय हुशार विद्यार्थी होता हे नसून त्याने मला एक वेगळा अनुभव दिला, हे होते. त्याच्याकडून मी वर्तमानपत्रांतील शब्दकोडी सोडवायला शिकलो. तो अनुभव बुद्धीला वेगळी चालना देऊन जायचा. पुढे आम्ही वेगवेगळ्या दिशांना गेलो. देविदास कॉलेजमध्येच राहून एम.कॉम. मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. मी सीए करायचा विचार केला होता. त्यामुळे हॉस्टेलमध्ये राहू शकत नव्हतो. मी, उल्हास आणि एक मावसभाऊ शेखर असे आम्ही वरळी येथील आदर्शनगरमध्ये राहायला होतो. येथे शेखरला माझ्या या छंदाचा उपसर्ग झाला. तोही या छंदात गुरफटला. काही कारणाने वरळीही सोडावी लागली. 1967 च्या जुलैला मी मडगावला परतलो. पुढे मी शार्प आणि टॅनन या फर्ममध्ये आधी व्यावसायिक व नंतर भागीदार म्हणून लागलो. येथेही कालांतराने फिर्दोष बुचिया हा या छंदाचा बळी असलेला भागीदार मित्र मिळाला. या सगळ्यामध्ये एक प्रकारचे वेगळेच समाधान मिळत होते. शेखर पणजीला असल्याने कधीकधी भेटायचा. प्रत्येक वेळी तो या छंदाची मला आठवण करून द्यायचा.

माझी मुलगी मला आवर्जून सांगायची की अल्झायमरसारख्या व्याधींना घाबरण्याचे कारण नाही. तिच्या वाचनात असे आले होते की ज्यांचा मेंदूचा डावा भाग सतत काहीतरी करत असतो, त्याला असा त्रास होऊ शकत नाही. कोड्यांच्या अंतरंगात जाऊन मी एकच उदाहरण देऊ शकतो. एका शब्दाचा क्लू ‘महिला वकील’ असा होता. आडव्या-उभ्या अक्षरातून ‘पोरशिया’ असे उत्तर आले. ही कोण होती. मग आठवले, शायलॉक, पाऊंड ऑफ फ्लॅश, ड्रॉप ऑफ ब्लड. मार्च 2020 अखेर कडक लॉकडाऊन सुरू झालं. छापील वर्तमानपत्रे यायची बंद झाले. आणि माझा तो छंद तिथेच संपला. तरीसुद्धा माझा मित्र फिर्दोस मला अधूनमधून जागवत असतो. पण ते दिवस आता गेले…