28.1 C
Panjim
Sunday, September 26, 2021

दार्जिलिंग : रत्नांची भूमी

पायाला भिंगरी
(भाग-२)
– सौ. पौर्णिमा केरकर
हिमालयाच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणांत सम्राज्ञीच्या लौकिकास प्राप्त झालेले दार्जिलिंग पाहण्याचा योग गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आला. भारतीय लोकमानसाची हिमालयाचे भव्यत्व आणि दिव्यत्व अनुभवण्याची ओढ पूर्वीपासूनचीच. मलाही ती होतीच. माझ्यात असलेल्या इच्छेची तृप्ती दार्जिलिंगला गेल्याने पूर्ण झाली.
पूर्वेकडचा हिमालय ही भारताची जीवनरेषा. आकाशाशी स्पर्धा करणार्‍या हिमालयाच्या पर्वतरांगा अनुभवताना तना-मनाला आगळावेगळा अनुभव प्राप्त होतो. पश्‍चिम बंगाल राज्यात एकूण एकोणीस जिल्हे असून ३,१४९ चौरस कि.मी. क्षेत्रफळ आहे. दार्जिलिंग हा जिल्हा १९८० साली ‘गोरखालँड चळवळी’मुळे प्रकाशात आला. ‘कालीम्पॉंग’ हे गोरखालँड चळवळीचे केंद्र होते. गोरखा लोकांनी आरंभलेल्या चळवळीमुळे पश्‍चिम बंगालच्या अंतर्गत १९८८ मध्ये ‘दार्जिलिंग गोरखा हिल काऊन्सिल’ची स्थापना करण्यात आली. परंतु काही काळ शांत झालेली ही चळवळ पुन्हा डोके वर काढू लागल्याने सरकारने जादा हक्क प्रदान केले. सध्या दार्जिलिंग शहर हे एक जिल्ह्याचे मुख्यालय असून ११.४४ चौरस कि.मी. ते वसलेले आहे.
जगातील सर्वोच्च उंचीच्या तिसर्‍या क्रमांकाच्या कांचनजुंगा पर्वतशिखराचे दर्शन दार्जिलिंग येथून अनुभवायला मिळत असल्याने त्याचे महत्त्व वृद्धिंगत झालेले आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी दार्जिलिंगवर सिक्कीमची सत्ता होती. पर्वतशिखरांत वास्तव्य करणार्‍या गोरखा लोकांच्या मनात दार्जिलिंगचे मोठे आकर्षण होते. १७८० मध्ये त्यांनी दार्जिलिंगवर ताबा मिळवण्याचे बरेच प्रयत्न केले. १८१४ मध्ये ब्रिटिश आणि गोरखा यांच्यात अटीतटीची लढाई झाली. त्यात ब्रिटिशांनी गोरख्यांचा पराभव करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. थंड हवेचे ठिकाण, हिमालयाच्या पर्वतरांगा, यामुळे ब्रिटिशांनी आपल्या बंगाल प्रांताची उन्हाळी राजधानी म्हणून दार्जिलिंगचा विकास केला. आर्थर कॅम्पबेल आणि रॉबर्ट नेपियर या ब्रिटिश अधिकार्‍यांनी दार्जिलिंगला शहर म्हणून विकसित करण्यास महत्त्वाचे योगदान दिले. १८६६ पासून सध्याचे दार्जिलिंग अस्तित्वात आले. डोंगररांगांत वसल्यामुळे दार्जिलिंगला महामार्ग असा नाहीच. त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात येथे रस्ते उभारण्यात आले. १८८१ मध्ये ब्रिटिशांनी दार्जिलिंग हिलरेल्वेची मुहूर्तमेढ रोवली. ‘दार्जिलिंग हिमालय टॉयट्रेन’चा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळांत समावेश केल्याने दार्जिलिंगच्या वैभवात मानाचा तुरा खोवला गेला.
थंड हवेचे ठिकाण म्हणून दार्जिलिंग नावारूपास आल्याने एकेकाळी अत्यल्प लोकसंख्या असलेला हा प्रदेश नेपाळ, तिबेट, भुतान, पश्‍चिम बंगाल आदी ठिकाणांहून आलेल्या लोकवस्तीने गजबजलेला आहे. त्यामुळे येथील मूळच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वैभवात वैविध्यता जाणवते. विविधतेतील एकात्मता या भूमीशी समरस झालेली अनुभवता येते. वेगवेगळ्या प्रांतांतले लोक दार्जिलिंगला स्थायिक झाल्याने येथे नेपाळी, बंगाली, तिबेटी, भुतिया, लेपच्या आदी भाषांची चलती आहे. ‘चहा’ हे पेय खरेतर आपल्या देशातले नव्हे. चीनमधून आपल्याकडे चहा आला. ब्रिटिशांनी नगदी चहापिकाला जणू काही राजाश्रय दिला आणि त्यामुळे चहा पेयाने आपले बस्तान भारतात कायमचे बसवले. ब्रिटिश अमदानीत दार्जिलिंगच्या परिसरात चहाच्या मळ्यांना प्राधान्य लाभले आणि दार्जिलिंगच्या चहाने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात नावलौकिक मिळविला. चहा उद्योगाच्या माध्यमातून मोठी उलाढाल होत असल्याने आज चहा उद्योग दार्जिलिंगच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनलेला आहे.
नाना धर्म, नाना पंथ, नाना जाती-जमाती यांच्या लोकवस्तीमुळे दार्जिलिंगला ‘वैशिष्ट्यपूर्ण’ चेहरा लाभलेला आहे. भगवान गौतम बुद्धाची येथे जशी उपासना केली जाते तशीच हिंदू देवदेवतांची उपासना इथल्या मंदिरांतून होते. ब्रिटिश अमदानीत येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी ख्रिश्‍चन धर्माचा प्रसार केला. १८४१ मध्ये सेंट ऍण्ड्र्यू चर्चची उभारणी झाली. १८७३ मध्ये तिची पुनर्बांधणी करण्यात आली. दार्जिलिंगच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे सेंट ऍण्ड्र्यू चर्च एक संचित आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांत वसलेल्या दार्जिलिंगमध्ये बारमाही आल्हाददायक हवामान असते. त्यामुळे उत्तर भारतात ग्रीष्माच्या उन्हातल्या झळा भेडसावू लागल्या की पावले आपोआप दार्जिलिंगकडे वळू लागतात. दार्जिलिंगच्या पर्वतरांगा वृक्षवेलींनी समृद्ध असल्याने त्यांच्या नैसर्गिक वैभवात आणखीनच भर पडलेली आहे.
पर्वतरांगांत वसलेली येथील जंगले देवदार, ओक, साल आदी वृक्षांनी समृद्ध आहेत. येथे बर्फवृष्टी होत असल्याने हिमबिबळ्या आणि पांड्यासारख्या संकटग्रस्त प्राण्यांचे वास्तव्य आहे. इथले हवामान बारमाही थंड असल्याने एखाद्या आजारावर दीर्घकाळ उपचार करण्यासाठी ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांसाठी आरोग्यभवनाची उभारणी केली होती. पश्‍चिम बंगाल राज्यात दार्जिलिंग हा जिल्हा असला तरी इथली संस्कृती वैविध्यपूर्ण असल्याने आणि गोरखा लोकांचे प्राबल्य दार्जिलिंगमध्ये असल्याने वारंवार होणार्‍या लोकप्रक्षोभापुढे नमते घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने दार्जिलिंगला स्वायत्ता प्रदान केलेली आहे. ललॉयड वनस्पती उद्यान आणि पद्मजा नायडू हिमालयीन प्राणिसंग्रहालय यामुळे दार्जिलिंगच्या आकर्षणात विशेष भर पडलेली आहे. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित वारसास्थळांची रेलचेल दार्जिलिंगमध्ये असल्याने आणि हिमालयातच्या पर्वतरांगांत वावरणार्‍या तिबेटी, भुतानी, नेपाळी, सिक्किमी, बंगाली अशा विविध संस्कृतीच्या समन्वयाने दार्जिलिंगविषयीचे आकर्षण देशविदेशी पर्यटकांना वाटले नाही तर नवलच म्हणावे लागेल. चीनने तिबेट ताब्यात घेतल्याने हजारो तिबेटियन लोकांना आपली मातृभूमी सोडावी लागली. अशा तिबेटियन लोकांनी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांत जसा आश्रय घेतला, तसेच त्यांनी दार्जिलिंगला आपलेसे केले. तिबेटियन पुनर्वसन केंद्राने तर तिबेटियन संस्कृतीचे केलेले जतन या लोकांची आपल्या भूमीविषयीची आत्मीयताच दर्शविते.
खरे तर दार्जिलिंगला जाण्याचा विचार केल्यानंतर पहिल्या प्रथम समोर आले ते संपूर्ण डोंगररांगा व्यापून टाकणारे, डोळ्यांचे पारणे फेडणारे चहाचे मळे. जिकडे पाहावे तिकडे जणूकाही हिरवी शालच धरित्रीने ओढून घेतलेली आहे असाच भास होतो. हिरव्या रंगाचे चैतन्य तनामनाला उल्हसित करते. प्रवासाचा सारा थकवाच कोठल्या कोठे नाहीसा होतो. चहाच्या मळ्यांतून नागमोडी वळणाच्या वाटेने तिबेटियन पुनर्वसन केंद्रात जातानाचा प्रवास अंगावर रोमांच आणणारा. एका वेळेला एकच गाडी, तीही अगदी चितारलेल्या त्या नेटक्या वळणावळणांच्या वाटेने नीटस जाणारी. पहाडी भागात पर्यटकांना घेऊन भ्रमंती करणार्‍या चारचाकी गाड्यांच्या ड्रायव्हरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! या पहाडी इलाख्याशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असल्यानेच त्यांना वाटणारी आत्मीयता, पर्यटकांशी अदबीने वागण्याची पद्धत व व्यवसायामुळे आपल्या परिसराची असलेली ओळख या जोरावर ते पर्यटकांना खूश करण्यात तरबेज असतात. इथल्या चहाच्या बागा ही दार्जिलिंगची खास ओळख. पर्यटनाच्या दृष्टीतून ज्या बागा विकसित करण्यात आलेल्या आहेत त्या ‘हॅपी व्हॅली टी इस्टेट’च्या माध्यमातून अनुभवता येतात. वातावरणातील थंडावा उबदार वाफाळलेल्या चहाच्या घोटात रिचवतच हिरव्या गालिच्यांचे नेत्रसुख घेता येते. इथल्या चहाला ‘पूर्वेकडचे शँपेन’च संबोधले जाते. चहातून मिळणारी ऊर्जा आणि चहामळ्यांच्या दर्शनाने प्राप्त होणारा तजेला प्रवासभर सोबत करतो. दलाई लामांच्या भारतातील आगमनाबरोबर आलेल्या तिबेटी लोकांचे पुनर्वसन १ ऑक्टोबर १९५९ रोजी ‘तिबेटियन रेफ्युजी सेल्फ हेल्प सेंटर’च्या माध्यमातून झाले. त्यात तिबेटियन कलाकुसरीचे सुंदर गालिचे, लोकर, लाकूड, चामडे या हस्तकलांचे उत्पादन आणि विक्री अनुभवता येते.
सौंदर्याची अनुभूती घेण्याच्या मनोवृत्तीतून प्रवास करणार्‍या पर्यटकांना आवडणारी आणि आकर्षित करणारी अशी अनेक ठिकाणे दार्जिलिंगला आहेत. वेळेअभावी सर्वत्र मनात असूनही पोहोचता येत नाही ही खंत आहेच. परंतु अशी कोणती स्थळे आहेत याचा शोध घेतला तरीही ज्ञानात भर पडणारीच असते. त्यांत सहलीसाठी सेंचाल लेक, रंगीत नदीकाठचा अजीतार, व्हिक्टोरिया धबधबा, पर्यावरणप्रेमींसाठी लॉइड बोटनिकल गार्डन, नॅचरल हिस्ट्री म्युझियम, देशभक्त चित्तरंजन दास यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले ‘स्टेप असाईड’ हे कुटीर, ललित कलाकौशल्याचे उत्कृष्ट नमुने असलेली ‘आव्हा आर्ट गॅलरी’, बौद्ध मोनेस्ट्री, भूतीया वस्ती मोनेस्ट्री असे बरेच काही. दार्जिलिंगचा डोंगराळ, दर्‍याखोर्‍यांचा परिसर हा गिर्यारोहकांच्या दृष्टीने मोठा साहसी आणि रोमांचक असाच आहे. साहसी पदभ्रमणासाठी पदभ्रमणप्रेमींची पसंती दार्जिलिंगलाच जास्त असते. दार्जिलिंगपासून सिलिगुडी हा ५० कि.मी.चा प्रवास असला तरी १०० कि.मी.च्या दुसर्‍या रस्त्यादरम्यान १.२५ कि.मी. लांबीचे बोटिंगची सुविधा असलेले निसर्गसुंदर मिरीक लेक परतीच्या प्रवासात पाहता आले. चमकते कांचनजुंगा सृष्टिवैभवाने नटलेले दिसते. पहाटे उठून त्याचा विलोभनीय अनुभव घेता येतो. दार्जिलिंगचा प्रवास हा एक आनंदानुभव होता. दार्जिलिंगसाठी उतरावे लागते न्यू जलपैगरी येथे. ते कलकत्याहून थेट जोडले गेलेले आहे. यानंतरचा सारा प्रवास हा वळणावळणांचा, खडतर पण तेवढाच अविस्मरणीय अनुभवाची शिदोरी देणारा….
परतीचा प्रवास आल्हाददायकच. दार्जिलिंग ते मिरीक लेकपर्यंत सोबत केली ती रस्त्याच्या दुतर्फा डोंगर उतारावर असलेल्या विलोभनीय अशा चहाच्या मळ्यांनी. दार्जिलिंगला जाऊन आलो ही ओळखीची खूण म्हणून चहापावडर नातेवाईक, मित्रमंडळीसाठी घ्यायला हवीच. मीही ती घेतली. खास चहाच्या मळ्यातीलच होती म्हणून तिचे वेगळेपण वाटत राहिले. मिरीक लेकचे सौंदर्य नजरेत भरून घेतले. इतक्या लांबचा प्रवास इथे येणारे सारेच पर्यटक करतात. हजारोंच्या संख्येने येथे पर्यटकांची ये-जा असते. ज्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी इथपर्यंत लोक येतात त्या सार्‍यांनीच जर स्वच्छतेविषयीची साक्षरता मनाला पटवून दिली तर एवढा नयनरम्य परिसर अस्वच्छ झाला नसता. पर्यटकांच्या वागण्यातील बेशिस्तपणाच कोठेतरी या निसर्गरम्य जागेला विद्रूप करून टाकतो म्हणून खंत वाटते.
तिबेटी भाषेत दार्जिलिंग म्हणजे बहुमौल्यवान रत्नांची भूमी. मार्च ते जून या कालावधीत या भागाला भेट दिली तर या भूमीतील निसर्गसौंदर्याची रत्ने अनुभवता येतात. नेपाळच्या हद्दीत येणार्‍या पशुपतीमार्केटमधून खरेदी करण्याचा आनंद होताच, त्याहीपेक्षा नेपाळच्या भूमीला स्पर्श केल्याचे वेगळेपण होते. माऊंट एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवणार्‍या शेरपा तेनसिंगचे वास्तव्य दार्जिलिंगलाच असे याचीही आठवण झाली. दार्जिलिंगची छोटी आगगाडी हे तर खास आकर्षण. आता तर ही आगगाडी पर्यटकांचे लक्ष वधून घेणारी ठरली आहे. एका कालखंडात जसा पंजाब प्रांतामधील खलिस्तान चळवळीने जोर धरला होता, त्याच तर्‍हेने दार्जिलिंगमध्ये ‘गोरखालँड’च्या मागणीने जोर धरला होता. त्यामुळे काहीकाळ ही रत्नभूमी अशांत, अस्वस्थ होती. परंतु पश्‍चिम बंगालमधील या लोभस निसर्गरम्य परिसराने आपली अस्वस्थता, अशांतता मागे सारलेली दिसते. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने येणार्‍या पर्यटकांनी हा परिसर बहरून उठतो. भल्या पहाटे कांचनगंगेचा सूर्योदय पाहण्याची उत्सुकता बाळगून आलेली सौंदर्यसक्त मनाची माणसे इथे रांगा लावताना दिसतात. हा परिसर आहेच तसा, तनामनाला वेड लावणार्‍या उत्तुंग पर्वतशिखरांप्रमाणेच मनातील विचारांची उंची वाढवणारा. जीवनातील अशांततेला, नैराश्याला तजेला देणारा. विविध संस्कृती, इतिहास, माणसांचे जतन जिवापाड करणारे दार्जिलिंग मनाला मोहिनी घालते.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

महिलांचे अर्थार्जन

नीना नाईक दोन वर्षांत यश-अपयश, बेरीज-वजाबाकी यात प्रेम, द्वेष, आत्मीयता हे उघड झाले. कुठलाही व्यवसाय करताना… कोरोनाने हे...

‘डिटॉक्स डाएट’ म्हणजे काय?

वर्षा भिडे(आहारतज्ज्ञ) डिटॉक्स आहाराची गरज असेल तरच आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करा, अन्यथा ते प्रकृतीसाठी त्रासदायक...

‘कॉलेजविश्व’

शुभंकर जोगजीव्हीएम्स जीजीपीआर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, फर्मागुडी मागची काही वर्षे आपण बघतोय ही कोरोना महामारी चालू आहे ज्यामुळे आपल्याला...

गोव्यातही खेला होबे!

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सध्या लोकप्रिय घोषणांच्या आतषबाजीत गोव्याचे राजकीय वातावरण ढवळून काढलेले असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही...

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर...

ALSO IN THIS SECTION

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

सुधाकर रामचंद्र नाईक ‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन...

ताण, तणाव आणि आपण

गिरिजा मुरगोडी तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट...

मुंगी ः एक किमयागार

अंजली आमोणकर नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा...

विमा उद्योगाचे खाजगीकरण

शशांक मो. गुळगुळे अलीकडे केंद्र सरकारकडून खाजगीकरणाबाबत बर्‍याच क्रांतिकारक घोषणा करण्यात आल्या. विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून याला...

विघ्नराजं नमामि

लक्ष्मण पित्रे निर्विघ्नपणाने कोणतेही कार्य पूर्ण व्हावे म्हणून आपण प्रथम विघ्नेश्‍वर गणपतीला वंदन करतो. हा विघ्नांचा नियामक, विघ्नहर्ता...