दामोदर भजनी सप्ताहास उत्साहात सुरूवात

0
17

>> वास्कोत अखंड भजनी सप्ताह, विविध गायनाच्या मैफली रंगल्या, मान्यवरांनी घेतले दर्शन

वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सवाला काल मंगळवार दि. 22 रोजी दुपारी 12.30 वाजता सुरुवात झाली. जोशी कुटुंबीयांतर्फे श्री दामोदर देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर हरी जय जय राम कृष्ण हरी नामाच्या गजरात 24 तासांचा अखंड भजनी सप्ताह सुरू झाला.
या भजनाला ज्येष्ठ भजनी कलाकार अशोक मांद्रेकर यांच्या गायनाने प्रारंभ झाला. यावेळी विविध पारसमितीतर्फे श्रीचरणी श्रीफळ अर्पण केले. दुपारी दोन वाजल्यापासून अखंड 24 तास साखळी पद्धतीने स्थानिक भजनी पथकांच्या भजनाला सुरुवात झाली.

दरम्यान संध्याकाळच्या सत्रात विविध पार समितीतर्फे पारांचे व गायन मैफलींचे आयोजन करण्यात आले होते. वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताहाला 124 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. कोरोना महामारीमुळे 2020 व 2021 मध्ये गर्दीवर कडक निर्बंध लागू झाल्याने हा सप्ताह केवळ धार्मिक विधीपुरताच मर्यादीत राहिला होता. मागच्या वर्षी या उत्सवावर निर्बंध नव्हते. मात्र, कोरोनाची सुप्त भीती होती. तरीही पालिकेने फेरीवाल्यांना फेरी थाटण्यासाठी संमती दिली होती. दोन वर्षांच्या खंडानंतर मोठ्या प्रमाणात फेरीवाले दाखल झाले होते. भाविकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून देवदर्शन तसेच फेरीचा लाभ घेतला होता. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांबाबत शासकीय निश्चित धोरण जाहीर झाले नव्हते.याचा परीणाम काही प्रमाणात पार व गायनाच्या मैफलीच्या आयोजनावर झाला होता.

आता निर्बंधांचा काळ पूर्णपणे ओसरल्याने यंदा मात्र, तीन वर्षानंतर सर्व समाजांनी जोरदार पूर्वतयारी केली. त्यानुसार सर्व पार व गायनाचे कार्यक्रम इत्यादींची पर्वणी भाविक व संगीत श्रोत्यांना लाभली. संध्याकाळी 6 वाजल्यापासून दिंडीच्या गजरात पार मिरवणुका मंदिराकडे निघाल्या. या दरम्यान प्रत्येक पार समितीतर्फे गायनाच्या मैफलींचे आयोजन केले होते. त्यानुसार नटराज थिएटर, वास्को दूरीष्ट टॅक्सी स्टँण्ड, मुरगाव पालिके समोर आदी ठिकाणी गायनाच्या बैठकी झाल्या. यात महाराष्ट्र, गोवा येथील गायक कलाकारांचे गायन झाले. या गायक कलाकारांना विविध पार समितींनी आमंत्रित केले होते. बैठका पहाटे चार वाजेपर्यंत या मैफली सुरू होत्या. या काळात दिंड्या पारासहीत मंदिराकडे मार्गणक्रमण करत होत्या. यंदा गोव्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून भाविकांनी उपस्थिती लावून श्री दामोदर भजनी सप्ताहाचा आनंद लुटला.

मान्यवरांची उपस्थिती
काल राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, माजी वीजमंत्री मिलिंद नाईक, उद्योगपती नारायण बांदेकर, शिवानंद साळगावकर, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवान करमली, मुरगावचे पोलीस उपअधीक्षक सलिम शेख, पोलीस निरीक्षक कपिल नायक तसेच इतर मान्यवरांनी दामोदर देवाचे दर्शन घेतले.