सोमवारी सकाळी ७ वा. सुमारास करमणे-दाभाळ जंक्शनवर बोलेरो जीप व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप पांडुरंग नाईक जागीच ठार झाला. दरम्यान, जीपचा चालक पंकज प्रकाश पेडणेकर (काकोडा) याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अपघातास कारणीभूत जीप सेझा गोवा कंपनीची असल्याचे आढळल्यानंतर लोक चवताळले. सेझा गोवा भरपाई देत नाहीत तोपर्यंत मृतदेह हटविणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. शेवटी निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी नागरिकांना समजावून मृतदेह हटविला.
अधिक माहितीनुसार प्रदीप नाईक काल सकाळी ७ वा. आपली डीओ स्कूटर घेऊन दाभाळला चालले होते तर बोलेरो जीप सावर्डेहून दाभाळला जात होती. दोन्ही वाहनांची जोरदार धडक बसल्यानंतर श्री. नाईक यांचा मृत्यू झाला. जीपचा वेग एवढा होता की नंतर झाडाला ठोकर देऊन ती उलटी पडली. याबाबत माहिती कळताच सुमारे ३०० ग्रामस्थांचा जमाव घटनास्थळी जमा झाला. जीप सेझा गोवा कंपनीची असल्याने कंपनी भरपाईचे आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह हटवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. १० लाख रु. भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी होती. मात्र कंपनीचे अधिकारी तेथे फिरकलेच नाहीत, शेवटी निरीक्षक शिरोडकर यांनी मध्यस्थी करून मृतदेह हटवला व उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यानंतर जमावाने कंपनीच्या दाभाळ येथील कार्यालयावर मोर्चा नेला व १० लाख रु. भरपाई देण्याची मागणी केली. आता यासंबंधी जिल्हाधिकार्यांसमोर कंपनीचे अधिकारी व मृताच्या नातेवाईकांची बैठक दि. ३ रोजी होणार असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापकांनी सांगितले.