Home बातम्या ‘दाबोळी’ विस्ताराला आगळे महत्त्व

‘दाबोळी’ विस्ताराला आगळे महत्त्व

0

नवीन टर्मिनलच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री अजित सिंग

गोव्यासारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असलेल्या राज्यातील दाबोळी विमानतळाच्या या विस्तार कामाला एक वेगळे महत्त्व असल्याचे प्रतिपादन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अजित सिंग यांनी काल केले. दाबोळी विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

गोवा हे लहान राज्य असले तरी या राज्याचा विकास दर उत्तम असल्याचे ते म्हणाले. यावरून देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीत या राज्याने दिलेले मौल्यवान योगदान प्रतिबिंबित होते. अशा शब्दात त्यांनी गोव्याची प्रशंसा केली.
केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री के. सी. वेणूगोपाल, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, खासदार फ्रान्सिस सार्दिन, शांताराम नाईक, आमदार माविन गुदिन्हो आदी यावेळी उपस्थित होते.
दाबोळी राहणार ः मुख्यमंत्री
दाबोळी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, या विमानतळाचे विस्तारीकरण केले तरी २०१६ पर्यंत हवाई प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ होईल त्यामुळे मोप विमानतळाची गरज भासेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दाबोळी विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सांगितले. पुढील वर्षी विमानासाठीच्या इंधनावरील मूल्यवर्धित कर कमी करून तो ५ टक्क्यांवर आणण्याचा विचार पर्रीकर यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसने संरक्षण मंत्रालयाकडून अतिरिक्त जमीन दाबोळीला मिळवून द्यावी. आपण राष्ट्रीयत्व मानणारा असल्याने नौदलाला दाबोळीहून हटविण्याची आपण मागणी करणार नसल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. मोप विमानतळाची गरज आहे. पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येणार असल्याने विमानतळ उभारण्याची इच्छा असलेल्या कंपन्यांना तो आर्थिकदृष्ट्या परवडला पाहिजे, असेही ते म्हणाले.