दाबोळी विमानतळावरही ई-व्हिसा सुविधा : श्रीपाद

0
58
गोव्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली.
गोव्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या बरीच जास्त आहे. ई-व्हिसा सुविधेनंतर ती आणखी वाढेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ते असेही म्हणाले की, भारतात व्हिसा शुल्क बराच जास्त आहे, तो कमी करण्याची गरज असून तसे झाल्यास पर्यटनाला आणखी लाभ होईल. त्यासंबंधी विचार चालू असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी श्रीलंकेचे उदाहरण देताना तेथे २५ डॉलर्स व्हिसा शुल्क असून भारतात तो १०० डॉलर्स असल्याचे सांगितले.

गोव्यात येणार्‍या विमानांच्या तिकीटीही बर्‍याच महाग आहेत. त्या कमी करण्याच्याबाबतीतही विचार असल्याचे ते म्हणाले. भारतात पर्यावरण पर्यटन व वैद्यकीय पर्यटनाचा विकास करण्याच्यादृष्टीने योजना तयार केली जात असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, गोव्यात यंदा होणार असलेल्या सेंट फ्रांसिस झेवियर शव प्रदर्शन सोहळ्यासाठी केंद्राच्या पर्यटन व संस्कृती खात्यातर्फे खास निधी दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
बार संस्कृतीवर नियंत्रण हवे, त्याचा प्रसार होऊ नये, असे केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. गोवा सरकारच्या मंत्र्याने मिनी स्कर्टवर बंदीची मागणी केली होती त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता नाईक म्हणाले की, बार संस्कृती व उत्तान वेशभूषा भारतीय परंपरेत बसत नाही. दरम्यान, राज्यांतील कॅसिनोंसंबंधी प्रश्‍नावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. हा राज्याचा विषय असल्याचे ते म्हणाले.