काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस यांच्या नव्या आरोपांमुळे राज्यात खळबळ
दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीकरिता बंद करण्यासाठी गोवा सरकारने केंद्र सरकारला संमती दिल्याचा आरोप केल्यानंतर दाबोळी विमानतळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीसाठी बंद झाल्यास 5 ते 6 लाख लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे हा विमानतळ बंद करू नये, अशी मागणी विरियातो फर्नांडिस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्राद्वारे
केली आहे. दाबोळी विमानतळ बंद करण्याचा निर्णय पक्का झाला असून, त्यासंदर्भात फाईल तयार केल्याची माहिती संसदेत आपल्याला मिळाल्याचा दावा फर्नांडिस यांनी केला. दरम्यान, राज्यातील काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दाबोळी विमानतळ प्रश्नी राज्य सरकारवर टीका केली.
दाबेोळी विमानतळ नागरी वाहतुकीसाठी बंद करण्यास राज्य सरकारने केंद्राला संमती दिल्याचा आरोप खासदार विरियातो फर्नांडिस यांनी नवी दिल्ली येथे काल केला. खासदार फर्नांडिस यांनी संसदेच्या बाहेरून एक व्हिडिओ जारी करून हा दावा केला. आपल्याला संसदेत या कथित संमतीबाबत गोपनीय माहिती मिळाली आहे, असे फर्नांडिस यांनी म्हटले आहे.
विरियातो फर्नांडिस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दाबोळी विमानतळाबाबत एक पत्र पाठविले असून, दाबेोळी येथील नागरी विमान वाहतूक सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. दाबेोळी विमानतळावरून सध्या दररोज सुमारे 50-60 नागरी विमाने उड्डाणे करतात. त्यामुळे दाबोळी विमानतळ लष्करी आणि नागरी विमानांसाठी कार्यरत ठेवण्याची मागणी फर्नांडिस यांनी केली आहे.
युरी आलेमावांकडून जनआंदोलनाचा इशारा
दाबोळी विमानतळ नागरी सेवेसाठी बंद करण्याचा घाट केंद्र सरकारने रचला असून, मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली नाही, तर दाबोळी विमानतळासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल मडगावातील पत्रकार परिषदेत दिला. यावेळी आमदार एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते.
सरकारने स्पष्टीकरण द्यावे : पाटकर
राज्य सरकारने दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीसाठी बंद करण्याच्या प्रश्नी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली. दाबोळी विमानतळ नागरी विमान वाहतुकीसाठी बंद करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी झाल्याचे वृत्त धक्कादायक आहे. दाबोळी नागरी वाहतुकीसाठी बंद झाल्यास गोव्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहे, अशी भीती अमित पाटकर यांनी व्यक्त केली.
स्पष्टीकरण द्या; अन्यथा आंदोलन : सरदेसाई
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीसाठी खुला राहण्याबाबत सात दिवसांत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली. येत्या सात दिवसांत दाबोळी विमानतळाबाबत स्पष्टीकरण न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला.
दाबोळी विमानळ गोव्यासाठी महत्त्वाचा : व्हिएगस
दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीसाठी सुरूच राहावा म्हणून आम आदमी पक्ष प्रयत्नशील राहणार आहे, असे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी म्हटले आहे.
माविन गुदिन्हो यांनी सर्व शक्यता फेटाळल्या
दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीसाठी बंद होण्याची कोणतीही शक्यता नाही, असा दावा मंत्री माविन गुदिन्हो यांनी काल केला. आपण दिल्ली केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन दाबोळी विमातळाच्या विषयावर चर्चा केली आहे.
जीएमआर कंपनीवर गुदिन्होंचा आरोप
जीएमआर कंपनी दाबोळी विमानतळाला विशेष नौदल सुविधेत रुपांतरित करण्यासाठी लॉबिंग करत आहे. मात्र केंद्र सरकारने दोन्ही विमानतळ कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे.