दाबोळी चालूच राहणार ः प्रभू

0
107

दाबोळी विमानतळाचे नूतनीकरण तसेच आधुनिकरण करण्यात येत असल्याने भविष्यात गोव्यात पर्यटन सेवा तसेच इतर वापरासाठी दाबोळी विमानतळ चालूच राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी काल दाबोळी विमानतळाच्या प्रशासकीय इमारतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या विमानतळावर आणखी कोणत्या सुविधांच्या विस्ताराची गरज आहे त्याची पाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, महसूलमंत्री रोहन खंवटे, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, दाबोळी विमानतळ संचालक भूपेश नेगी, गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई आदी उपस्थित होते.

दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकांची समस्या सोडविण्यासाठी विमानतळावर स्वतंत्र कक्ष सुरू करणार असून त्याचा लाभ स्थानिक टॅक्सी चालकांना मिळेल. गोव्यातील हस्तकला तसेच खाद्य पदार्थांना चालना देण्यासाठी खास कक्ष सुरू करण्यात येणार आहे. तिथे स्वयंसेवी गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येतील. गोव्यात आलेल्या पर्यटकांना माघारी जाताना गोव्यातील हस्तकलेच्या वस्तू घेऊन जाण्याची संधी मिळेल. कौशल्य विकास या योजनेअंतर्गत अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रभू म्हणाले.