दाबोळी खून प्रकरणातील दोन संशयितांना अटक

0
68

छडा लावण्यात रेल्वे पोलिसांना यश

दाबोळी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर गुरुवारी अज्ञात इसमाच्या झालेल्या खून प्रकरणाचा चोवीस तासात तपास लावण्यात रेल्वे पोलिसांना यश आले असून याप्रकरणी दोघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र मयताची अद्याप ओळख पटलेली नाही.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपींची नावे मोहन बंदी (४१) व वासू पिल्ले (२८) अशी असून दोघेही रेल्वे स्थानकासमोरील झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत. बुधवारी रात्री मयत जवळ असलेल्या एका बारमध्ये दारू पिऊन सरळ रेल्वे स्थानकाजवळ गेला होता. यावेळी दारुच्या नशेत असलेल्या दोघाही आरोपींची व मयताची रेल्वे स्थानकावर बाचाबाची होऊन त्याचे रुपांतर मारामारीत झाले.

दोघांनीही मयताला जबर मारहाण करीत रेल्वे रुळापर्यंत नेले. वासू याने मयताला घट्ट पकडून ठेवले. तर मोहन जवळ असलेल्या आपल्या झोपडीमध्ये जाऊन चाकू घेऊन आला. मोहन याने नंतर मयतावर चाकूने अनेक वार केले. तेथून त्याला पुन्हा रेल्वे स्थानकापर्यंत नेले नंतर पुन्हा रेल्वे रुळाकडे आणून मयताच्या डोक्यावर दगड घालून चेहरा छिन्न-विछीन्न करण्यात आला. नंतर आरोपी मोहन जीए-०६-एच-०८४१ क्रमांकाच्या ऍक्टीव्हा दुचाकीने होली क्रॉस पर्यंत जाऊन तेथील झुडूपामध्ये चाकू लपवून ठेवला. नंतर रेल्वे स्थानकाजवळच्या नळावर दोघांनीही हात धुवून घेतले.

गुरुवारी दिवसभर पोलीस पंचनामा करताना दोघेही आरोपी घटनास्थळी उपस्थित होते. रेल्वे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शरीफ जे. ज्याकीस यांनी पोलिसांचे वेगवेगळे गट करून माहिती गोळा करण्यास पाठविले. संध्याकाळी उशिरापर्यंत बरीच माहिती उपलब्ध झाल्याने दोघाही आरोपींना मध्यरात्री ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. नंतर काल सकाळी त्यांना रितसर अटक केली. मयताचा शवचिकित्सा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मद्यप्राशन व इतर गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. संशयित आरोपी हे दोघेही गुंड असल्याचे समजते. रेल्वे पोलिसांनी आरोपी मोहन याने वापरलेली ऍक्टीव्हा दुचाकी व सुरा जप्त केला असून उपनिरीक्षक ज्याकीस पुढील तपास करीत आहेत.