दाबोळी येथील विमानतळ नागरी हवाई उड्डाणासाठी बंद करण्याचे षडयंत्र गोवा सरकारने रचले आहे असा आरोप करून राज्यात 2027 साली विधानसभा निवडूक झाल्यानंतर भाजप सरकार दाबोळी विमानतळावरील नागरी हवाई उड्डाण बंद करील, असा संशय काँग्रेस नेते व दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. दाबोळी विमानतळावरील नागरी हवाई उड्डाणामुळे मोप विमानतळावरील नागरी हवाई उड्डाणावर परिणाम होत आहे. परिणामी मोप विमानतळ चालवणाऱ्या जीएमआर या कंपनीला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत झालेले त्यांचे नुकसान हे 266.8 कोटी रु. एवढे असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या पार्श्वभूमीवर मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवणारी जीएमआर ही कंपनी दाबोळी येथील नागरी हवाई उड्डाण सेवा बंद करण्यासाठी गोवा सरकारवर दबाव आणत आहे. तर दुसऱ्या बाजूने दाबोळी विमानतळ परिसराजवळ जमिनी विकत घेतलेले बिल्डरही दाबोळी विमानतळ नागरी हवाई उड्डाणासाठी बंद केला जावा यासाठी गोवा सरकारच्या संपर्कात असल्याचेही कॅप्टन फर्नांडिस म्हणाले.
दाबोळी विमानतळावर नागरी हवाई उड्डाण सेवा चालूच राहिल्यास दाबोळी परिसरात जमिनी विकत घेतलेल्या राज्याबाहेरील मोठ्या जमीन विकासकांना (बिल्डर्स) तेथे मोठ्या बहुमजली इमारती बांधता येणार नसल्याने ते चिंतेत आहेत. नागरी हवाई उड्डाण व लँडिंगमुळे विमानतळ परिसरात बांधकामांना उंचीची मर्यादा घालून देण्यात येत असते. मात्र, नौदलाच्या विमानांसाठी ही उंचीची मर्यादा नसते, असे फर्नांडिस यांनी माहिती देताना सांगितले. सरकारला या बिल्डर्सनाही खूष करायचे असल्याचा आरोप फर्नांडिस यांनी यावेळी केला.
उड्डाणपूल दाबोळी
विमानतळासाठी नव्हे
दाबोळी येथे जो उड्डाण पूल (फ्लायओव्हर) बांधण्यात येत आहे तो दाबोळी विमानतळासाठी नसून तो मुरगाव बंदरात येणारा कोळसा वाहून कर्नाटकात नेण्यासाठीच्या वाहनांसाठी असल्याचा दावाही फर्नांडिस यांनी यावेळी केला. हा उड्डाणपूल बांधण्यापूर्वी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचा ना हरकत दाखला घेण्यात आला नव्हता आणि या उड्डाणपुलाचे बांधकाम उंचीच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यानंतर या पुलाचे 17 खांब कापून त्यांची उंची कमी करण्यात आल्याचे फर्नांडिस म्हणाले.
दाबोळी विमानतळावरील नागरी हवाई उड्डाण सेवा बंद करण्याचा निर्णय गोवा सरकारने तूर्त येऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थगित ठेवलेला आहे, असे सांगून निवडणुकीनंतर ही सेवा बंद केली जाईल, असा आरोप फर्नांडिस यांनी केला.

