दाबोळीत ५७ लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त

0
140

गोवा कस्टम विभागाने काल मंगळवारी पुन्हा एकदा केलेल्या कारवाईत दुबईमार्गे गोव्यात दाबोळी विमानतळावर उतरलेल्या भटकळ कर्नाटक येथील महम्मद आयुब या प्रवाशाकडून ५७ लाख रुपये किंमतीची १५३८ गॅ्रम वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त केली. गेल्या दहा दिवसातील ही सोने तस्करीची तिसरी घटना असून सोमवारी एका कोटी अकरा लाख रुपयांची सोन्याची तस्करी पकडण्यास गोवा कस्टम विभागाला यश आले होते.

गोवा कस्टम आयुक्त मिहीर रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार दुबई मस्कतमार्गे दाबोळी विमानतळावर आलेल्या ओमन एअर फ्लाईट (डब्ल्यूवाय ०२०९) या विमानातून आलेल्या प्रवाशांची गोवा कस्टम विभागाच्या कस्टम अधिकार्‍यांनी झडती घेतली असता भटकळ येथील महम्मद अयुब या आंतरराष्ट्रीय प्रवाशाकडे त्याने त्याच्या बॅगेत लपवलेली १५३८ ग्रॅम वजनाची तेरा सोन्याची बिस्किटे सापडली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत ५७.६७ लाख रुपये एवढी होते. २०१९-२० या आर्थिक वर्षात ३.४३ कोटी रुपयांची सोन्याची तस्करी पकडण्यास गोवा कस्टम विभागाला यश आले.