मोसमी पावसाचे रीतसर आगमन अद्याप गोव्यात व्हायचे आहे. पण त्याच्या आधीच मुसळधार पावसाने गोव्याला जी पहिली सलामी दिली, त्यात राजधानी पणजीसह सर्व शहरांमध्ये प्रशासकीय सज्जतेचा जो बोजवारा उडाला तो बोलका आहे. ह्या पहिल्याच पावसाच्या तडाख्याने सर्व प्रमुख शहरे पाण्यात बुडाली, घरे, दुकाने, वाहने यांचा पाण्यापासून बचाव करताना नागरिकांच्या नाकीनऊ आले. वेधशाळेने आधीच नागरिकांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. वेधशाळेचे अंदाज नेमके उलट होण्याचा काळ आता उरलेला नाही. आधुनिक डॉप्लर रडार आणि इतर यंत्रणांमुळे हवामानाचा आणि पर्जन्यमानाचा नेमका अचूक अंदाज वर्तवणे अलीकडे वेधशाळांनाही शक्य होत असते. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस होणार ह्याची पूर्वसूचना वेधशाळेने दोन दिवसांपूर्वीच दिली होती. मग ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली होती? पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली, शहरे जलमय झाली, घरा – दुकानांत पाणी शिरले. पावसाचे प्रमाण काही भागांत जास्त होते. विशेषतः म्हापसा आणि पेडण्यामध्ये काल दिवसभरात सहा इंच पाऊस पडला. त्यामुळे सर्व भाग जलमय होणे समजून घेता येते, परंतु इतर शहरांमध्येही पूरस्थिती निर्माण होणे ह्याचा अर्थ पूरनियंत्रक व्यवस्थेमध्ये निश्चितच त्रुटी आहेत. राजधानी पणजी तर स्मार्ट बनल्याचा टेंभा मिरवला जात आहे. परंतु पहिल्याच पावसाच्या तडाख्यात पणजीची जी स्थिती झाली त्यातच ह्या घोषणांतला फोलपणा दिसला. शहराशहरांतून रस्त्यांकडेच्या गटारांतील कचरा रस्त्यावर आलेला पाहायला मिळाला. म्हणजे पाऊसपूर्व गटार स्वच्छता स्थानिक पालिकांनी केलेलीच नव्हती असा त्याचा अर्थ होतो. अनेक भागांत झाडे पडली. आपापल्या परिसरातील धोकादायक झाडांची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी फांद्या छाटण्याचे काम हाती घेणे आवश्यक असते. किती शहरांमध्ये हे काम पूर्ण झाले होते आणि किती पालिका आता जाग्या झाल्या होत्या हे पाहण्याजोगे आहे. अनेक भागांत पहिल्या पावसाच्या दणक्यामुळे वीज खंडित झालेली आहे. झाडांच्या फांद्या तारांवर पडल्याने ही स्थिती झाली आहे. यंदा पहिल्याच पावसात विजेचा धक्का लागून लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. माणसाचे प्राण एवढे स्वस्त झाले आहेत का? वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांचा असा हकनाक बळी जाऊ नये ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्यास भाग पाडावे. पहिल्याच पावसात रस्ते उखडताना दिसत आहेत. मोसमी पावसाच्या सरी कोसळल्या की खड्डे दिसू लागतील. रस्त्यांच्या बांधकामामध्ये आपल्याकडे जेवढा भ्रष्टाचार दिसतो, तेवढा अन्यत्र क्वचितच असेल. त्यामुळे प्रत्येक पावसामध्ये रस्त्यांना खड्डे पडतात, नव्याने हॉटमिक्स केलेले डांबर उखडते आणि कंत्राटदारांची चांदी होते. ह्या पावसात जे रस्ते खराब होतील, त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जावे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ज्या अधिकाऱ्यांनी ह्या कामांची गुणवत्ता तपासली होती त्यांच्यावर कारवाई व्हावी, तरच ह्या दरवर्षीच्या प्रकाराला आळा बसेल. शहरांमधील गटारांमध्ये अनेक इमारतींतील सांडपाणी थेट सोडलेले आहे. वास्तविक ही गटारे केवळ पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असतात. परंतु त्यात थेट सांडपाणी सोडणाऱ्यांविरुद्ध संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाई करावी ह्यासाठी आरोग्य खाते सक्रिय हवे. ते दिसत नाही. त्यामुळे पणजीसारख्या शहरातील मध्यवस्तीमधील गटारांमध्ये दुर्गंधी आढळते. पाऊस झाला की हे सांडपाणीमिश्रीत पाणी रस्त्यावर येते. गटारे झाकण्यासाठी सिमेंटच्या लाद्या बसवल्या जातात. परंतु त्यांचा डिझाईनच असा आहे की त्याच्या हँडलभोवती पाणी साचते. अशाने डेंग्यूचा फैलाव होण्याची शक्यता आहे हे आरोग्य खात्याला कळू नये हे आश्चर्य आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही म्हणूनच पाऊस येतो आणि दरवर्षी आपल्या प्रशासकीय सज्जतेचा बोजवारा आणि जनजीवनाची दाणादाण उडवून जातो. पाऊस तोंडावर आला तरी काही भागांत रस्ते फोडण्याची कामे चालली आहेत. कळंगुट साळगावात केबलिंगसाठी रस्ते खोदून ठेवलेले आहेत. मडगावात मलनिःस्सारण वाहिन्यांचे काम अर्धवट आहे. पाऊस ही काही आपल्यासाठी नवी गोष्ट नाही. तो दरवर्षी येतो. असाच मुसळधार कोसळतो. त्यामुळे त्याला सामोरे जात असताना आपली तयारीही तेवढीच जोराची हवी. परंतु प्रशासकीय सुस्तता, अनास्था याची परिणती म्हणून पावसाळापूर्व कामांकडे ज्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे ते दिले जात नाही. पावसाळ्याला सामोरे जाण्यास आपण खरेच सज्ज आहोत का ह्याचा विचार व्हावा आणि दिसणाऱ्या त्रुटी दूर केल्या जाव्यात.