मंगळवारी सकाळी पडलेल्या धुक्यामुळे व नंतर नौदलाने घेतलेल्या आक्षेपामुळे येथून मुंबईला जाणारी दोन विमाने पाच तास पर्यंत अडकून पडल्याने सुमारे ३५० प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. एअर इंडिया आणि गो एअरची दोन विमाने सकाळी ७.४५ वाजता दाबोळी विमानतळावरून मुंबईला जाणार होती. मात्र दाट धुके असल्याने सदर विमानांना १५ मिनिटे उशिर झाला.
नियमानुसार दाबोळी विमानतळाची धावपट्टी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत नौदलासाठी राखीव असल्याने नौदलाने दोन्ही विमानांना उड्डाण करण्यास आक्षेप घेतल्याने दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना दाबोळी विमानतळावर प्रतिक्षा करावी लागली. याप्रवाशांमध्ये वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा हे सुद्धा अडकून पडले. दुपारी १ वाजल्यानंतर दोन्ही विमानांनी मुंबईला जाण्यासाठी उड्डाण केले.

