कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा एक प्रमुख हस्तक इक्बाल मिर्ची (६३) याचे काल येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मिर्ची हा दाऊद इब्राहिमच्या युरोपमधील अमली पदार्थ व्यवहार व दुबईतील रियल इस्टेट व्यवसाय सांभाळत होता. अंमली पदार्थ व खंडणी वसुलीच्या अनेक गुन्ह्यांप्रकरणी तो भारताला हवा होता.
मुंबई येथील पत्रकार जे डे यांची हत्या व आयपीएल फिक्सिंग या प्रकरणांमधील त्याच्या सहभागाविषयी मुंबई पोलिसांकडून तपास चालू आहे. इक्बाल मेमन हे त्याचे खरे नाव असून तो १९९० च्या सुमारास भारतातून निसटला होता. गेली २० वर्षे त्याचे लंडनमध्ये वास्तव्य होते. त्याचे कुटुंबीय भारतात लाल मिरची पावडरच्या व्यापारात होती. त्यामुळे त्याला मिर्ची हे नाव पडले.