यंदा परीक्षेला १८५०९ विद्यार्थी बसले होते. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. वरील विद्यार्थ्यांपैकी १५७९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे रिबेलो यांनी सांगितले. २०३२ विद्यार्थी ठराविक विषय घेऊन परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९३७ उत्तीर्ण झाले. एक किंवा दोन विषयात नापास झालेल्या व एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा १४४४ एवढा आहे.
राज्यातील ३६५ हायस्कूलपैकी ८६ हायस्कूलचा निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लागलेला असून त्यात विशेष विद्यार्थ्यांसाठीच्या दोन हायस्कूलचा समावेश आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.१९ एवढी आहे. तर मुलींची ८५.४९ एवढी आहे.
यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व समाज विज्ञान हे विषय वगळून परीक्षा देण्याची सोय करण्यात आली होती. हे विषय सोडून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार असल्याचे रिबेलो म्हणाले. आठवी इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही असा निर्णय झाल्यानंतरची दहावीची ही पहिलीच परीक्षा असल्याने यंदा दहावीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचा आकडा कधी नव्हे एवढा वाढल्याचे रिबेलो म्हणाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चांगला निकाल लागला आहे हे खरे असले तरी यंदाचा निकाल हा गेल्या काही वर्षांत जेवढा निकाल लागत असे आसपास तेवढाच असल्याचे ते म्हणाले. अपवाद केवळ गेल्या वर्षाचा असून गेल्या वर्षी ७७ टक्के एवढा निकाल लागला होता, अशी माहिती त्यांनी दिली.