दहावीच्या परीक्षेस प्रारंभ

0
210

 

कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर दहावीच्या परीक्षा केंद्रावर मुलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना हाती घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला कालपासून प्रारंभ करण्यात आला. दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर प्री-व्होकेशनचा होता. त्यामुळे परीक्षा केंद्रावर जास्त गर्दी नव्हती. हा प्री- व्होकेशनल पेपर ३४४ विद्यार्थ्यांनी सोडविला. येत्या शनिवार २३ मेपासून मुख्य विषयांच्या पेपरना सुरुवात होणार आहे.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी विविध उपाययोजनांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर येणार्‍या मुलांची थर्मल गनद्वारे तपासणी करून केंद्रात प्रवेश देण्यात आला. तेथे सॅनिटायझर्स उपलब्ध करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राची स्वच्छता करण्यात आली आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी एका वर्गात केवळ १२ विद्यार्थ्यांना बसविण्यात येत आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा घेतली जात असल्याने परीक्षेचा विषय न्यायालयात नेऊन स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न झाला. तथापि, केंद्र सरकारने दहावी, बारावीची परीक्षा घेण्यास मान्यता दिल्याने न्यायालयाने परीक्षेला हिरवा कंदील दाखविला आहे. न्यायालयाने कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवरील मुलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. मंडळाकडून या सूचनांचे पालन करण्यावर भर दिला आहे.