दहावीची परीक्षा २१ मेपासून

0
167
>> बारावीची २० ते २२ मे दरम्यान; मुख्यमंत्र्यांची माहिती
सरकारने गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यास काल मान्यता दिली आहे. दहावीची परीक्षा २१ मेपासून आणि बारावीची परीक्षा २० ते २२ मे दरम्यान घेतली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. बारावीच्या काही विषयांची परीक्षा शिल्लक आहे. तर, दहावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली नाही. शालांत मंडळातर्फे दहावी व बारावीची परीक्षा कधी घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सदर वेळापत्रक रात्री उशिरा जाहीर करण्यात आले असून आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सोमवारी शिक्षण खाते, मंडळाच्या अधिकार्‍यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर दहावी व बारावीची परीक्षा लॉकडाऊननंतर घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते.
राज्य सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय जाहीर न केल्याने राज्यभरात परीक्षेबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. मुलांवर मानसिक ताण येत असल्याची पालकांकडून तक्रार केली जात होती. केंद्र सरकारने कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचा हरीत विभागात समावेश करून अनेक व्यवसाय सुरू करण्यात मान्यता दिल्याने दहावी व बारावीची परीक्षा घेण्याची मागणी पालकांकडून केली जात होती. त्यामुळे राज्य सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यास मान्यता दिल्याने पालक व विद्यार्थ्यांनी सुस्कारा सोडला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाची मान्यता
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दहावी आणि बारावीची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा घेण्यास मान्यता घेण्यात आली आहे. बारावीचे तीन पेपर शिल्लक आहेत. तर, दहावीची पूर्ण परीक्षा शिल्लक आहे. परीक्षा घेताना सामाजिक अंतर व इतर दिशानिर्देशांचे पालन केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
मजुरांना रेल्वेने पाठवणार
रेल्वे मंत्रालयाकडून मजुरांच्या वाहतुकीसाठी खास रेल्वेगाडी उपलब्ध केल्यानंतर मजुरांना परत पाठविण्यात येणार आहेत. येत्या २ दिवसात रेल्वेगाडीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
परराज्यात जाण्यासाठी इच्छुक मजुरांची नोंदणी सुरू आहे. परराज्यात जाण्यास इच्छुक मजुरांचे समुपदेशन करून ठेवून घेण्याची मागणी केली जात आहे. सरकारकडून राहण्यासाठी दबाव आणला जाऊ शकत नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
३१०० नमुन्यांची चाचणी
राज्य सरकारने कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर आत्तापर्यंत ३१०० नमुन्यांची तपासणी पूर्ण केली आहे. घरोघरी आरोग्य  सर्वेक्षणाच्या श्‍वसनाच्या तक्रारी केलेल्याची नागरिकांच्या नमुन्याची तपासणी केली जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
आयआयटी संकुलासाठी जागा सुपूर्द
आयआयटी- गोवाचे संकुल उभारण्यासाठी गुळेली सत्तरी येथील १० लाख चौरस मीटर जमीन एका छोटेखानी कार्यक्रमात आयआयटी व्यवस्थापनाच्या स्वाधीन करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
विद्यार्थी, नागरिकांना सोडण्यासाठी परराज्यात जाणार्‍या कदंब बसगाड्यांच्या चालकांना क्वारंटाईन केले जाणार नाही. त्यांची कोविड चाचणी केली जाणार आहे. अहवाल नकारात्मक आल्यानंतर कामावर रुजू होण्यास मान्यता दिली जाईल. बसगाड्यांची स्वच्छता करून राज्यात आणल्या जात आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दावणगिरीसारखी परिस्थिती उद्भवू नये
परराज्यातून राज्यात प्रवेश करणार्‍याची कोविड चाचणी करून प्रवेश दिला जात आहे. परराज्यातून प्रवेश करणार्‍यांना होम क्वारंटाईन केले जात आहेत. गोवा राज्याचा हरित विभागात समावेश झाला म्हणून गाफील राहणे योग्य होणार नाही. कर्नाटक राज्यातील दावणगिरी भागात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. परंतु, त्याठिकाणी कोरोना विषाणूचे २५ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यात आगामी काळात कोरोनाचा फैलाव होऊ नये सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोमेकॉत ७ संशयित दाखल
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलच्या कोरोना आयझोलेशन विभागात ७ कोरोना संशयित रूग्णांना काल दाखल करण्यात आले आहेत. तर, जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत ३०० नमुन्यांची करण्यात आलेली चाचणी नकारात्मक आहे.
दहावी
दिनांक   वेळ विषय
२१ मे   ९ ते ११.३० प्रथम भाषा-इंग्रजी, मराठी, उर्दू,
प्रथम भाषा – (सीडब्लूएसएऩ)
२२ मे   ९ ते ११.३० द्वितीय भाषा – हिंदी, फ्रेंच
  द्वितीय भाषा – सीडब्लूएसएन
९ ते १२ द्वितीय भाषा
२३ मे ९ ते ११.३०   तृतीय भाषा
२६ मे ९ ते ११.३०   गणित
२७ मे ९ ते १०.३० सोशल सायन्स – १
९ ते  ११.३०इतिहास आणि समाज शास्त्र (सीडब्लूएसएन)
२८ मे ९ ते १०.३० सोशल सायन्स – २
९ ते ११.३० भूगोल आणि इकोनॉमिक्स (सीडब्लूएसएऩ)
२९ मे ९ ते ११   एनएसक्यूएफ विषय्
३० मे ९ ते ११ प्री व्होकेशनल विषय
१ जून ९ ते ११.३० विज्ञान
९ ते १२ जनरल सायन्स (सीडब्लूएसएन)
२ जून ९ ते ११   पेंटींग (सीडब्लूएसएन)
३ जून ९ ते ११ वर्ड  प्रोसेसिंग (सीडब्लूएसएन)
४ जून ९ ते ११ फ्लोरीकल्चर   (सीडब्लूएसएऩ)
५ जून       ९ ते ११   बेकरी (सीडब्लूएसएन)
६ जून ९ ते ११ डेस्क टॉप पब्लिसिंग (सीडब्लूएसएन)
बारावी
दिनांक  – वेळ विषय
बुधवार – २० मे    सकाळी ९ ते ११.३० मराठी भाषा २
सकाळी ९ ते १२ मराठी भाषा २ सीडब्लूएसएन
गुरूवार – २१ मे   सकाळी ९ ते ११.३० समाज शास्त्र
                    सकाळी ९ ते १२   समाज शास्त्र  सीडब्लूएसएन
शुक्रवारी- २२ मे   सकाळी ९ ते ११.३० भूगोल,
        भूगोल सीडब्लू एसएन.