सेवा युद्ध पदक विजेत्याचाही समावेश
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात काल हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत भारतीय लष्करास कर्नल हुद्याचा अधिकारी व दोन जवान शहीद झाले. जवानांनी दोन दहशतवाद्यांनाही ठार केले. विशेष म्हणजे या चकमकीत शहीद झालेल्या मुनिंद्रनाथ राय यांना एका दिवसापूर्वी प्रजासत्ताक सोहळ्यात युद्ध सेवा पदक बहाल करण्यात आले होते.या चकमकीत गोरखा रायफलसचे कर्नल मुनिंद्रनाथ राय हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी बदामी बाघ कंटोनमेंट इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे उपचारांदरम्यान निधन झाले.
त्राल भागातील मिंडोरा खेड्याला लष्करी जवान व पोलिसांनी वेढा घालून दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव सिंग शहीद झाले.
ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आदिल खान व शिराज दार अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्राल भागात हिज्बुल मुजाहिद्दिनचे दहशतवादी दडले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर मोहीम उघडण्यात आली होती. घटनास्थळावरून शस्त्रे व दारुगोळा ताब्यात घेण्यात आला.

