Home बातम्या दहशतवादी हल्ल्याचे भाजपाकडून राजकारण ः पी. चिदंबरम

दहशतवादी हल्ल्याचे भाजपाकडून राजकारण ः पी. चिदंबरम

0

भारतीय जनता पक्ष दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी काल केला. भाजपा बराच काळ सत्तेपासून दूर असल्याने त्यांना कामे कशी चालतात ते ठाऊक नाही, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली.

भाजपा नेते अरुण जेटली यांनी तत्पूर्वी पत्रकार परिषदेत कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला लोक उबगले असून सततच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आणि भ्रष्टाचारामुळे सरकारने आपली पत गमावली असल्याची टीका केली होती. संसदेच्या एकाच सत्रात सरकारची पत एवढी ढासळलेली यापूर्वी कधी पाहण्यात नव्हती अशी टीका जेटली यांनी केली. राष्ट्रीय सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय आहे. केवळ आम्ही दहशतवाद सोसणार नाही एवढे म्हणणे पुरेसे नाही. दहशतवादाचा निःपात करणे हे आपले लक्ष्य असायला हवे असे जेटली यांनी सांगितले. स्फोटानंतर जखमींच्या नातेवाईकांनी चिदंबरम व इतर कॉंग्रेस नेत्यांची हुर्यो उडवली असेही जेटली म्हणाले. चिदंबरम यांनी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली हुर्यो उडवली गेल्याचा इन्कार केला. पुण्यातील बेस्ट बेकरी स्फोट, मुंबईतील स्फोटमालिका आणि दिल्लीतील स्फोट हे आपल्या गृहमंत्रीपदाच्या कारकिर्दीवरील कलंक असल्याचे चिदंबरम यांनी मान्य केले. परंतु इतर सरकारांवरही असेच कलंक होते आणि भविष्यातही असे हल्ले होणार नाहीत याची कोणी खात्री देऊ शकणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. देशातील पोलीस व्यवस्था अपेक्षेएवढी सक्षम नाही आणि त्याची अनेक कारणे आहेत. जनता आणि पोलीस यांचे व्यस्त प्रमाण, कामाच्या प्रदीर्घ वेळा यामुळे पोलिसांवर ताण असतो, असे ते म्हणाले. जनता व पोलीस यांचे प्रमाण योग्य असावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. अधिक पोलीस कर्मचार्‍यांची भरती करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या पोलिसाला चौदा तास ड्यूटी करावी लागते. तीन आठवडे सुटी मिळत नाही या परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे, असे चिदंबरम म्हणाले.