दहशतवादाचे बदलते स्वरूप

0
17

या वर्षी 11 सप्टेंबरला अमेरिकेच्या विश्व व्यापार केंद्रावरील भीषण दहशतवादी हल्ल्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने जगभरातील दहशतवादी कारवायांतील स्थित्यंतरे आणि निर्माण झालेले नवे धोके यांची गांभीर्याने चर्चा चालली आहे. अमेरिकेच्या विश्व व्यापार केंद्रावरील तो हल्ला अल कायदासारख्या संघटित दहशतवादी शक्तीने केला होता. त्याचा निःपात अमेरिकेने केल्यानंतर आयसिस नावाचा नवा जागतिक धोका समोर आला. त्याविरुद्ध सर्व महासत्तांना एकत्र येऊन लढावे लागले आणि इराक आणि सीरियामधून त्यांचा नायनाट करावा लागला. परिणामी आज जरी इस्लामी दहशतवादाचा हा धोका पूर्णतः नष्ट झालेला नसला, तरी फार मोठ्या प्रमाणातील संघटित दहशतवादाऐवजी छोट्या छोट्या गटांतून त्या कारवाया चालवल्या जात असल्याचे दिसते. ओसामा बिन लादेन किंवा अबू बकर अल बगदादीसारखे एकछत्री नेतृत्व त्याला दिसत नाही. ठिकठिकाणी स्वतःहून प्रेरित होऊन दहशतवादी कृत्ये करणाऱ्या ‘लोन वूल्फ’ मध्ये मात्र कमी आलेली दिसत नाही. भारतापुरता दहशतवादाचा विचार करायचा झाला, तर सर्वांत ठळकपणे लक्ष जाते ते काश्मीरकडे. नव्वदच्या दशकापासून काश्मीरमध्ये मृत्यूचे तांडव चालत आले. 2001 मध्ये आपल्या संसदेवर हल्ला चढवण्यापर्यंत दहशतवाद्यांची मजल गेली. 2008 मध्ये सव्वीस नोव्हेंबरला मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ला झाला आणि हा राक्षस किती अक्राळविक्राळ स्वरूपात समोर उभा आहे ह्याची जाणीव देशाला झाली. सुदैवाने 2014 मध्ये देशात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने दहशतवादाच्या निःपातासाठी आवश्यक असलेली कठोर नीती अवलंबून त्याचा कणा मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न आजवर केला आहे आणि ह्याचे श्रेय ह्या सरकारला द्यावेच लागेल. पाकिस्तानने काश्मीरमध्ये कुरापती काढणे सुरूच ठेवले होते. परंतु उरीच्या लष्करी ठाण्यावर हल्ला होताच नियंत्रण रेषेपलीकडे सर्जिकल स्ट्राईक करून भारताने दहशतवादा संदर्भातील आपल्या संयमाची रेषा पहिल्यांदा ओलांडली. तरीही नंतर पुलवामा दहशतवादी हल्ला घडला. त्याला भारताने बालाकोटवरील कारवाईने प्रत्युत्तर दिले. मात्र, ह्या दोन्ही कारवायांच्या सत्यतेबद्दल देशातील विरोधी पक्ष पाकिस्तानच्या सुरांत सूर मिळवून शंका उपस्थित करीत होतेच. शेवटी पहलगाममधील बैसरानचा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याचे खणखणीत प्रत्युत्तर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे दिले. ते केवळ नियंत्रण रेषेपलीकडच्या दहशतवादी तळांपुरतेच मर्यादित नव्हते. भारत – पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या ह्रदयस्थानी असलेल्या लष्करी तळांपर्यंत भारताने धडक दिली. जैश ए महंमद, लष्कर ए तय्यबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन ह्या तिन्ही दहशतवादी संघटनांची मुख्यालये नेस्तनाबूत करून भारताने आजवरच्या असंख्य दहशतवादी हल्ल्यांचा हिशेब चुकता केला. पाकिस्तान तोवर आपल्या अण्वस्त्रसज्जतेचा धाक भारताला दाखवत आला होता, परंतु ऑपरेशन सिंदुरमध्ये थेट पाकिस्तानची अण्वस्रे असलेल्या किराना हिलपर्यंत धडक देऊन भारताने जरब बसवली. एवढी की अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी मनधरण्या त्यांना कराव्या लागल्या. युद्ध हाताबाहेर जाऊ नये ह्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर आटोपते घेतले, तरी ते संपलेले नाही ह्याची जाणीव करून दिली. आजही ऑपरेशन सिंदूर मागे घेण्यात आलेले नाही. यदाकदाचित पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली, तर पुन्हा सीमापार जाण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचीही फिकीर करणार नाही हा खणखणीत संदेश भारताने दिलेला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मुख्यालये आणि लाँचपॅड उद्ध्वस्त झालेल्या दहशतवादी संघटनांनी पार पाकिस्तानच्या दुसऱ्या टोकाला आपले तळ नेले होते. मात्र, अलीकडे पाकिस्तानने अमेरिकेशी निर्माण केलेली जवळीक दहशतवाद्यांचा धीर चेपण्यास कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतामध्ये घातपाती कारवाया करण्याची आखणी चालली आहे आणि पुन्हा भारतीय नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांची जमवाजमव चालली असल्याच्या बातम्या आहेत. मात्र, भारताची दहशतवादविरोधी नीती आता बचावात्मक राहिलेली नाही आणि ती कोणाचा मुलाहिजा राखणार नाही हा विश्वास देशाला आज आहे. मात्र, देशांतर्गत दहशतवादी जाळी निर्माण करून भारताला आतल्या आत शत्रू निर्माण करण्याची नीती पाकिस्तान आखल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे यापुढे अंतर्गत धोक्यांकडे अधिक सजगतेने पाहावे लागेल. तंत्रज्ञानयुक्त नव्या पिढीचा वापर त्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे दहशतवाद ह्यापुढे आपल्या पारंपरिक चेहऱ्यानिशी समोर येण्याऐवजी साळसूद चेहऱ्यातून समोर येण्याचीच अधिक शक्यता आहे.