राज्यात दसरोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सज्ज झाले असून, देवालयांना कडक सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
राज्यात येत्या 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी विविध देवस्थानातून दसरोत्सव साजरा केला जाणार आहे. शिरगाव येथील लईराई देवस्थानच्या जत्रोत्सवात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेने देवस्थान समित्यांना उत्सवाच्या वेळी गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. राज्य सरकारने गर्दी व्यवस्थापन उपाय, नियामक अनुपालन, सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था आणि आपत्ती घडू नये म्हणून सरकारी अधिकारी आणि मंदिर समित्यांना निर्देश जारी केले आहेत.
सरकारी अधिकाऱ्यांना मंदिर समित्यांसोबत बैठका घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पोलिसांना पुरेसे कर्मचारी तैनात करण्याचे आणि 24 तास देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाविकांना मंदिरात स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर येण्यासाठी वेगळी व्यवस्था तयार करण्याची सूचना मंदिर समित्यांना करण्यात आला आहे.
मोठ्या गर्दीची अपेक्षा असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवा तैनात करण्याची सूचना करण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी एका आदेशाद्वारे गर्दी, वाहतूक कोंडीकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. सूचनांचे पालन न केल्यास कर्तव्यात कसूर मानली जाणार असून, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

