दवर्ली येथील ऍलन रॉड्रिग्स यांच्या घरावरील दरोडा व पेड सुरावली येथील गीतांजली नायक यांचे घर फोडल्याप्रकरणी तपास कामात पोलिसांना यश आले नाही. मात्र ऍलन रॉड्रिग्स यांची पळविलेली आयटेन कार मडगाव येथील एसपीडीए मार्केटात सापडली. दुचाकीचा पत्ता लागू शकला नाही. शनिवारी पहाटे दवर्ली येथे आठ जणांनी रॉड्रिग्स यांच्या बंगल्यावर दरोडा घातला होता. ही चोरांची आंतरराज्यीय टोळी असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मायणा-कुडतरी व मडगाव पोलिसांनी तीसपेक्षा जास्ती लोकांना ताब्यात घेऊन तपास केला. दरवर्ली येथील बंगल्या शेजारी दुचाकीचा शोरूम असून तेथील सुरक्षा रक्षकाने चोरी करण्यासाठी बंगला दाखवला होता असे दरोडेखोरांनी रॉड्रिग्स यांना सांगितले होते. पण ते खोटे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दक्षिण गोव्यात बहुतांश पोलीस इफ्फी व जुन्या गोव्यातील शव प्रदर्शन बंदोबस्तात व्यस्त असल्याने गस्त घालण्यासाठी पोलिसांची संख्या कमी आहे. मायणा कुडतरी पोलीस स्टेशनवर ८० जण पोलीस असले तरी त्यापैकी बहुतेक सुरक्षेसाठी पणजी व जुन्या गोव्याला आहेत.

