दरोड्यातील दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

0
16

येथील उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने गणेशपुरी म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणातील दोन संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. गणेशपुरी म्हापसा येथील डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावर मागील 7 ऑक्टोबरला एका पाच ते सहा जणांच्या टोळीने दरोडा घालून लाखोंचा ऐवज पळविला होता. या प्रकरणामध्ये म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपींना मदत केल्या प्रकरणात मूळ बांग्लादेशी नागरिक सफिकुल आणि राजू बी या दोघांना बंगळूर येथे अटक करून गोव्यात आणले होते. या प्रकरणातील संशयितांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात आणखी कुणाला अजूनपर्यंत अटक झालेली नाही. संशयित आरोपी पुरावे नष्ट करू शकतात किंवा फरार होऊ शकतात. या दरोडा प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे निरीक्षण न्यायालयाने जामीन फेटाळताना नोंदविले.