दरोडेखोरांच्या शोधासाठी टॅक्सीचालकाची चौकशी

0
10

दरोड्या दिवशीच काही जणांना टॅक्सीने सोडले होते बेळगावात

गणेशपुरीतील नागरिकांनी घेतली पोलीस उपअधीक्षकांची भेट

म्हापशातील डॉक्टरच्या बंगल्यावर दरोडा टाकलेल्या दरोडेखोरांच्या शोधात पोलिसांची विविध पथके कार्यरत असून, दरोडेखोरांनी बेळगावात पलायन केल्याचा संशय आहे. दरोड्या दिवशीच एका टॅक्सीचालकाने काही जणांना बेळगावात सोडले होते, त्या अनुषंगाने ते संभाव्य दरोडेखोर असल्याच्या संशयावरून काल म्हापसा पोलिसांनी ‘त्या’ टॅक्सीचालकाची चौकशी केली. सकाळी त्या टॅक्सीचालकाला पोलीस स्थानकावर बोलावले होते. तसेच त्याच्या टॅक्सीची फॉरेन्सिक तपासणी देखील करण्यात आली.

गणेशपुरी-म्हापसा येथील नामवंत डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर मंगळवारी पहाटे 3 ते 5 या दोन तासांच्या कालावधीत सहाजणांच्या बुरखाधारी टोळीने घातलेल्या दरोड्याचा तपास सध्या गतीने सुरू आहे. त्यांनी जवळपास 35 लाखांचा ऐवज लंपास केला होता.

डॉ. महेंद्र घाणेकर आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरोड्याच्या घटनेनंतर कुटुंबातील सर्वजण मानसिक तणावाखाली आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली. या प्रकरणात अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दर्शवला.

दरम्यान, गणेशपुरी येथील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने काल उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षा व्यवस्था वाढविण्याबाबत निवेदन दिले. या शिष्टमंडळात नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर, आशिष शिरोडकर, डॉ. गुरुदास नाटेकर आदींचा समावेश होता.

या परिसरातील गस्त वाढवावी, सुरक्षा व्यवस्था कडक करावी, बसशेड परिसरात आउटपोस्ट सुरू करून तेथे कायमस्वरूपी पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या भागातील सुरक्षा व्यवस्था कडक करावी आणि चोऱ्यांचे प्रकार रोखावेत, अशी मागणी देखील करण्यात आली.