राज्य सरकारने बायणा -वास्को येथील दरोडा प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बायणा वास्को येथील दरोडा प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामध्ये गुंतलेल्या संशयित दरोडेखोरांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तपास काम हाती घेतले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दोनापावल, म्हापसा आणि बायणा वास्को येथील तीन दरोडा प्रकरणांमुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विरोधी पक्षांकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला जात आहे. दोनापावल आणि म्हापसा दरोडा प्रकरणातील मुख्य संशयित आरोपींना अटक करण्यात अजूनपर्यंत यश आलेले नाही.
रात्रीची पोलीस गस्त, नाकाबंदी वाढविण्याचे निर्देश
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक आल्तिनो पणजी येथील सरकारी निवासस्थानी काल घेतली.
राज्यातील गुन्हे रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची गस्त, नाकाबंदी वाढविण्याचा निर्देश देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. राज्यात दरोडे, मोठ्या चोऱ्या नव्हे तर लहान चोऱ्या व इतर गुन्हे होऊ नये म्हणून उपाय योजना हाती घेण्याचा निर्देश देण्यात आला आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी खास रणनीती तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची पडताळणी प्रक्रियेला गती, बीट पोलीस व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची सूचना करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील वाढते गुन्हे रोखण्याच्या उपाययोजनेवर विचारविनिमय करून पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरक्षा वाढविण्याबाबत सूचना जाणून घेण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. या बैठकीला पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती.

