दरदिवशी दीड ते दोन हजार बेशिस्त वाहनचालकांना दंड

0
16

>> पोलीस उपअधीक्षक शिरोडकर यांची माहिती

राज्यभरात पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी ही मोहीम राबविली जात असून, दर दिवशी दीड ते दोन हजार वाहनचालकांना वाहतूक नियमभंग प्रकरणी दंड ठोठावला जात आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे वाहतूक पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी काल दिली.

राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात वाहन अपघातांत मोठी वाढ झाली आहे. वाहन अपघातांत मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी पोलीस तैनात करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
पणजी शहरात पाटो येथील पार्किंग प्लाझाजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून दंड आकारला जात आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.