मांद्रे मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण कॉंग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस पक्षाचे भाषिक व सांस्कृतिक धोरण आपल्याला मान्य आहे काय, असा प्रश्न विचारला असता, ते तेथील कार्यकर्त्यांना, मतदारांना मान्य आहे म्हणूनच त्यांनी कॉंग्रेस प्रवेशास पाठिंबा दिल्याचे सोपटे यांनी सांगितले.
पेडणे मतदारसंघ राखीव झाल्यानंतर भाजपने आपला विचार केला नाही. उत्तर गोवा निवडणूक समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली असली तरी हे पद निवडणुकीपुरते मर्यादित असते. तेथील गरीब जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांच्या हितासाठी काम करणे हे कर्तव्य आहे, असे ते एका प्रश्नावर म्हणाले. दि. १४ सप्टेंबरच्या मेळाव्यानंतर विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांना आपण घरी बोलविले होते, परंतु त्यांनी येण्याचे टाळले. ते आले असते तर आपल्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या असत्या, असे ते म्हणाले. परवा त्यांना आपण आमदारकीचा राजीनामा देणार याची माहिती मिळाल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला, परंतु आपण त्यांना भेटण्याचे टाळले. आपण भाजपच्या कोणत्याही नेत्यावर टीका करण्यास तयार नसल्याचे ते म्हणाले. भाजपच्या एक व्यक्ती एकपद या तत्त्वानुसार आमदार बनण्याची संधी गेल्याने आपण प्रदेश अध्यक्षपदाची मागणी केली होती, परंतु ते मिळाले नाही, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांच्या उपस्थितीत आपण कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी जगमितसिंग ब्रार यांची भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांनी मांद्रे मतदारसंघातील उमेदवारीचे आश्वासन दिल्याचे सोपटे यांनी सांगितले.