दगाबाज

0
252
  • दत्ताराम प्रभू-साळगावकर

आपण ज्यांच्यावर विश्‍वास किंवा अतिविश्‍वास ठेवतो ते लोकच आपल्याला दगाफटका देतात. दणका देतात. एवढा की जन्मभर आठवण राहील असा! असले संधीसाधू संधी कशी साधतात ते सांगणारी जुन्या जमान्यातली ही एक ऐकलेली गोष्ट…

काही लोक असे असतात की दुसर्‍यांच्या चांगुलपणाचा, परिस्थितीचा गैरफायदा घेतात; गरजवंतांचा व आपल्या नात्यांचा पण! फक्त आपली तुंबडी भरून घेण्यासाठी! अशावेळी ते आपला छुपा धूर्तपणा उपयोगात आणतात. वरवर गोडबोले पण आतून दगाबाज, कावेबाज, छुपे रुस्तम! अशा लोकांना तेवढेच वस्ताद भेटायला हवेत. अशा लबाडांच्या तावडीत साधासुधा सापडला की सापडणार्‍याचा विनाश, सत्यानाश! अशा लोकांचा धूर्तपणा, कावेबाजपणा, आमिषं, आश्‍वासनं योग्यवेळी ओळखायला हवीत; नाहीतर हाती भिक्षापात्र किंवा धुपाटणं! आपण ज्यांच्यावर विश्‍वास किंवा अतिविश्‍वास ठेवतो ते लोकच आपल्याला दगाफटका देतात. दणका देतात. एवढा की जन्मभर आठवण राहील असा! असले संधीसाधू संधी कशी साधतात ते सांगणारी (आताच्या नव्हे) जुन्या जमान्यातली एक ऐकलेली गोष्ट…

एका राज्यात एक मांत्रिक आला. त्याला विविध मंत्र अवगत होते. राजाच्या कानी जेव्हा ही गोष्ट पडली तेव्हा राजाला त्या मंत्रांविषयी एक प्रकारची जिज्ञासा उत्पन्न झाली. राजाने त्याला बोलावणे पाठवले. आपली ख्याती राजाच्या कानापर्यंत पोहोचली म्हणून मांत्रिक खूश झाला. लागलीच तो राजासमोर हजर झाला. राजाने त्याला अवगत असलेल्या मंत्रांची माहिती विचारली. मांत्रिकाला ती सांगावीच लागली. त्या मंत्रात एक मंत्र होता ‘परकायाप्रवेश’- म्हणजे अन्य कोणाच्याही शरीरात प्रवेश करायचा. कोणीएक फक्त मंत्र म्हणून अन्य कोणाच्या शरीरात प्रवेश करू शकतो का? राजाला त्या मंत्राविषयी कुतूहल निर्माण झाले. मांत्रिकाला त्याने विनंती केली की मला तो परकायाप्रवेश मंत्र शिकव. विनंती कसली? आज्ञाच ती, राजाज्ञा!

राजासोबत त्याचा कुब्जक नावाचा प्रधान उपस्थित होता. मांत्रिक म्हणाला, ‘‘महाराज, मी मंत्र सांगतो, शिकवतो, पण त्यावेळी फक्त महाराज व मी दोघेच उपस्थित असावेत, अन्य तिसरा कोणी नको.’’ राजाने विचारले, ‘‘का?’’ तर म्हणाला, ‘‘हा मंत्र आमच्या दोघांत म्हणजे चार कानांतच राहायला हवा; तिसरा कोणी असला व त्याने ऐकला तर सहाकानी जाईल. मंत्र शिकवण्यात मला अडचण नाही पण सहाकानी गेलेला मंत्र महाराजांच्या फायद्याचा नसेल; अडचणीत आणणारा असेल! नुकसानीचा ठरेल.’’
महाराज म्हणाले, ‘‘इथे अन्य कोणी नाही, उपस्थित आहेत ते माझे प्रधान! माझे अतिविश्‍वासू, खास मर्जितले! ते राज्यकारभारात माझे सल्लागार आहेत. त्यांच्याविषयी मला पूर्ण विश्‍वास व खात्री आहे. ते मला दगा देणार नाहीत. मंत्र सांग व शिकव.’’
राजाज्ञा! करणार काय?
मांत्रिकाने मंत्र सांगितला, शिकवला; राजा शिकला, प्रधानानं ऐकला(!)
एक दिवस राजा त्या प्रधानासोबत फिरायला गेला असता त्याला वाटेत रस्त्याच्या कडेला एक ब्राह्मण भिक्षूक मरून पडलेला दिसला. त्याच्या हातात पूजासाहित्य होतं. राजाला प्रश्‍न पडला की हा ब्राह्मण कसा मेला व इथे कसा पडला? उत्तर शोधून काढायची इच्छा झाली. परकायाप्रवेश मंत्र तर येतच होता; क्षणाचाही विचार न करता तो मंत्र राजाने म्हटला व भिक्षूक ब्राह्मणाच्या शरीरात प्रवेश केला. राजाचं शरीर निपचित पडलं! त्याच संधीचा फायदा घेऊन कुब्जक प्रधानानं तोच परकायाप्रवेश मंत्र म्हणून राजाच्या शरीरात प्रवेश केला. त्यामुळे भिक्षूक ब्राह्मणाच्या शरीरात प्रवेश केलेला राजा पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करू शकला नाही. कारण त्याचं शरीर कुब्जकाने अगोदरच काबीज केलं होतं. कुब्जकाचा दगा राजाला कळला पण त्याला उशीर झाला होता. आता कुब्जक बनला राजा व राजा बनला भिक्षूक!

राजा बनलेला कुब्जक गेला राजवाड्यात व भिक्षूक ब्राह्मण बनलेला राजा त्या ब्राह्मणाच्या घरी! जावंच लागलं, इलाजच नव्हता! कुब्जक राजा बनला तरी त्याची ‘जी हुजूर, जी हुजूर’ म्हणायची सवय जाईल कशी? इकडे भिक्षूक बनलेला राजा आपल्या राजाच्या आवेशात वावरू लागला. राणीला संशय आला की काहीतरी गौडबंगाल आहे; तिकडे ब्राह्मणाच्या बायकोलाही संशय आला. राजाने एकदा एकांतात राणीशी बोलताना त्याला अवगत असलेल्या परकायाप्रवेश मंत्राविषयी सांगितले होते. राणीला त्याची आठवण झाली. राणीने आपल्या एका विश्‍वासू दासीला व विश्‍वासू हेराला पाचारण केले व आपला संशय व्यक्त करून उलगडा करायची आज्ञा केली. दासी व हेर दोघंही हुशार निघाली व त्यांनी या गौडबंगालाचा उलगडा केला. त्यातून सुटका करण्याचा मार्गही त्यानी ठरवला.

राणीचा प्राणप्रिय असा पिंजर्‍यात पाळलेला एक पोपट होता, त्याला मारायचं व राणीनं त्याला जिवंत करण्यासाठी शोक करायचा! झालं, पोपटाला मारलं व राणी जोरजोरानं शोक करायला लागली. कुब्जक राजाच्या कानी ही गोष्ट गेल्यावर तो जातीनिशी राणीमहालात हजर झाला. ‘‘माझ्या पोपटाला जिवंत करा, जिवंत करा…’’ राणीचा शोक! करणार काय व कोण? गोष्ट एकाच्याच हाती होती तो म्हणजे कुब्जक; त्याला परकायाप्रवेश मंत्र अवगत होता! कुब्जकरूपी राजाला राणीची गोष्ट मान्य करण्याशिवाय पर्यायच नव्हता. कारण मेलेल्याला जिवंत करणं कोणालाच शक्य नव्हतं त्याच्याशिवाय! कारण परकायाप्रवेश मंत्र त्याला अवगत होता. त्यानं तो मंत्र म्हणून पोपटाच्या शरीरात प्रवेश केला. दासी व हेरानं पाताळयंत्रीपणे ब्राह्मणरूपी मूळ राजाला पाचारण केलंच होतं. पोपटाच्या शरीरात कुब्जकाने प्रवेश करताक्षणी राजाने आपल्या मूळ शरीरात प्रवेश केला. मूळ राजा जिवंत झाला व कपटी-दगाबाज कुब्जक बनला पोपट! राजाच्या शरीरात पुन्हा प्रवेश करायची त्याची संधी हुकली. सगळं घडलं कशामुळे? राणी, तिची दासी, हेर प्रामाणिक, खमके व वस्ताद मिळाले म्हणून; नपेक्षा परिस्थिती बिकट होती.
दगाबाज कसे असतात, कसा कावा करतात व दगा देतात हे शिकवण्याचीच ही गोष्ट!
दगाबाज, कावेबाजांपासून सावधान!!