दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात कमी मतदान

0
15

>> फोंडा, सांगे व काणकोण मतदान टक्केवारीत सरस

>> काणकोण तालुक्यात 76.82 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीत काल दक्षिण गोव्यातील मतदारांनी उकाड्याची पर्वा न करता मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7 वाजल्यापासून मडगाव, बाणावली, फातोर्डा, वेळ्ळी, नावेली, नुवे अशा बहुतांश मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. दक्षिण गोव्यातील फोंडा, सांगे व काणकोण तालुक्याच्या मानाने सासष्टीत कमी मतदान झाले.

सकाळी 9 वाजेपर्यंत 13.24 टक्के, सकाळी 11 वा. 31.46 टक्के, दुपारी 1 वा. 49.20 टक्के, दुपारी 3 वा. 61.50 टक्के तर 5 वा. 71.53 टक्के मतदान झाले होते. काणकोणात 76.82 टक्के मतदान झाले होते. त्यात फोंडा – 73.69, शिरोडा – 75.9, मडकई – 75.73, मुरगाव – 72.8, वास्को – 66.45, दाबोळी – 70.97, कुठ्ठाळी – 70.55, नुवे – 69.53, कुडतरी – 69.86, फातोर्डा – 68, मडगाव – 67.25, बाणावली – 67.25, नावेली – 69.79, कुंकळ्ळी – 70.96, वेळ्ळी – 66.37, केपे – 73.64, कुडचडे – 75.6, सावर्डे – 75.29, सांगे – 76.15 व काणकोण – 76.82 टक्के मतदान झाले.
नेत्रावळी, वाडे भागात तर दुपारी 12 वा. 70 टक्के मतदान झाले होते. सकाळी 10.30 वा. कुंकळ्ळी येथील तिन्ही मतदान केंद्रांवर फार मोठ्या रांगा लागल्या होत्या. गिरदोली व देमांदी येथे व्हिल चेअरवर बसून कित्येक ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर मतदान करायला आले. नवीन युवा मतदारांसाठी प्रत्येक केंद्रावर पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना बिल्ला देण्यात येत होता. तर कित्येक मतदान केंद्रावर रंगरंगोटी, पताका, फुगे, फुलांच्या माळा घालून सजवण्यात आल्या होत्या.
चांदर चर्चजवळील एका मतदान केंद्रात मतदान सुरू झाल्यानंतर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते दुरूस्त करण्यात विलंब झाला. दुरूस्त केल्यानंतर पुन्हा बंद पडले व अर्धा तास मतदान बंद झाले. तोपर्यंत मतदानासाठी आलेल्या महिला परत गेल्या. अर्ध्या तासानंतर मतदान यंत्रे बदलून नवी आणली. काणकोण, चावडी येथे मतदान केंद्रात मशिनात बिघाड झाल्याने मतदारांना 25 मिनिटे उभे राहावे लागले.

आर्ले, फातोर्डा येथील मतदान केंद्रावर मशिनाचे बटन दाबून मतदान केल्यानंतर चिन्ह न आल्याने मतदारांनी चिंता व्यक्त केली. एक पुरूष, तीन महिलांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही त्यांनी कोणतीच दखल न घेतल्याचे मतदारांनी पत्रकारांना सांगितले.
विजय सरदेसाई यांची

सत्ताधाऱ्यांविरुद्ध तक्रार
सत्ताधारी पक्षाचे नेते मतदारांना धमक्या देवून मतदान करण्यास लावतात. फातोर्डा मतदारसंघातील मतदान केंद्रावर एका महिलेने मतदान करून कोणाला मतदान केले त्याचा फोटो घेतला व भाजपच्या नेत्याना दाखवला. गुप्त मतदान करण्याचा अधिकार मतदारांना आहे. सदर महिला गोवा वैद्यकीय इस्पितळात नोकरी करते. भाजपला मतदान केल्यास तिची मडगाव येथे बदली करण्याचे आमीष दाखविण्यात आले होते. तिला चौकशीसाठी फातोर्डा पोलीस स्थानकावर नेले असता एका मटका एजंटाने पोलिसांवर दबाव आणून तिला सोडून दिले. आपण या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयुक्ताकडे करणार असे सरदेसाई यांनी सांगितले. फातोर्डा पोलीस निरीक्षकासमोर तक्रार केली आहे.

काल दुपारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार दिगंबर कामत यांच्या समवेत मोती डोंगरावर पहाणीसाठी गेले होते. ती माहिती आमदार विजय सरदेसाई यांना समजताच तेही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मोती डोंगरावर धावून गेले. आमदार दिगंबर कामत ज्येष्ठ नेते असूनही मोती डोंगरावरील मतदारांमध्ये धुसफूस चालू झाल्याने त्यांना समजावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आणल्याची तक्रार आमदार सरदेसाई यांनी केली.

बाणावली येथे अगदी मंद गतीने मतदान चालले होते. सासष्टीच्या आठही मतदारसंघांत कमी मतदान झाले. कित्येक लोक विदेशात असल्याने कमी मतदान झाल्याचे आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी सांगितले.
कुडचडे मतदारसंघात तिळामळ येथील चर्चमधील फादरने भाजपला मते देवू नका असे सांगितल्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची शक्ती बनवण्याचा प्रयत्नात आहेत. पल्लवी धेंपो ह्या प्रामाणिक व सामाजिक क्षेत्रातील उमेदवार आहेत, असे त्यांनी सांगितले.

कुंकळ्ळीत काँग्रेसला
आघाडी मिळणार : युरी

शेतात काम व गर्मीचे दिवस असल्याने लोक सावकाश मतदानासाठी येत होते. पण कुंकळ्ळी येथे 75 टक्के मतदान होईल व विरियातो फर्नांडिस यांना मताधिक्य मिळेल. परवा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सभेला आणलेली माणसे मतदारसंघाबाहेरल होती असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. वेळ्ळी व बाणावली मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत लोक मतदान करण्यास येत होते.