Home बातम्या दक्षिण आफ्रिकेतील गांधीजी

दक्षिण आफ्रिकेतील गांधीजी

0

– कॅजिटन परेरा

वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गांधीजी स्वतःच्या बेकारीवर उपाय म्हणून १८९३ च्या सुमारास दक्षिण आफ्रिकेस गेले. त्यांच्यापूर्वी अनेक वर्षे आधी कितीतरी भारतीय लोक दक्षिण आफ्रिकेत नोकरी, कामधंदा करून स्थिर झाले होते. दक्षिण आफ्रिका हा खंड ब्रिटिश लोकांची वसाहत बनला होता. तेथील गोर्‍या लोकांसाठी शेतीसाठी, घरकामासाठी व इतर कामांसाठी मजूर व हलकी कामे करणारे लोक भारतामधून येथील ब्रिटिश सरकार पाठवीत असे. आपल्याकडे गरिबी ही समस्या असल्यामुळे मद्रासी, तेलगू लोक कोठेही जाऊन पोट भरण्यासाठी कसलेही काम स्वीकारीत. द. आफ्रिकेत पारसी लोकांचे छोटे छोटे व्यवसाय होते. काही मुसलमान लोक आफ्रिकेत लहान कामे करून तेथील परिस्थितीनुरूप व्यवसाय करीत असत. द. आफ्रिकेत स्थिरावलेले अब्दुल्ला शेठ त्यावेळी आपल्या गावी म्हणजेच राजकोटमध्ये आले असता गांधीजींच्या बंधूशी झालेल्या त्यांच्या बोलण्यात मोहनदास गांधींना वकिली शिकूनही काम नसल्याचे समजताच त्यांनी त्यांना द. आफ्रिकेत पाठवण्याची सूचना दिली. तेथे हिंदी लोकांचे अनेक दावे मिळण्यासारखे होते. खुद्द अब्दुल्ला शेठच्या काही केसेस होत्या. त्यामुळे गांधींनी वरील परिस्थितीत द. आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला.

त्याकाळी परदेशी पोहोचण्याचे साधन म्हणजे आगबोटीचा प्रवास. कोलकत्त्याहून बोट सुटे. द. आफ्रिकेस पोचण्यास वीस दिवस लागत. लामू बंदर, मोझांबिक, झांझीबार असा प्रवास करीत अखेर गांधीजी द. आफ्रिकेतील नाताळ प्रांतात पोचले. डरबन बंदरी बोट लागल्यावर गांधीजींचा प्रवास संपला. तेथे त्यांना स्वतः अब्दुल्ला शेठ न्यायला आले होते. गांधीजींची व्यवस्था त्यांनी आपल्या घरीच केली. एक स्वतंत्र खोली त्यांना देण्यात आली. काठेवाड – गुजरातमध्ये गांधीजी पगडी वापरीत. त्याच पोशाखात ते दक्षिण आफ्रिकेत फिरू लागले.

डरबनमधील कोर्ट कचेरी पाहण्यास गेले असताना त्यांच्या डोक्यावरील पगडी होती. तेथील रिवाजाप्रमाणे कोर्टामध्ये डोक्यावर टोपी अथवा पगडी उतरवून ठेवावी लागे. तेथील न्यायाधीश महाशयांनी गांधीजींना कडक भाषेमध्ये कोर्टाचा रिवाज सांगितला. डोक्यावरून पगडी उतरविणे त्यांच्या स्वाभिमानात अथवा भारतीय परंपरेत बसत नव्हते, परंतु एवढा लांब पल्ल्याचा प्रवास करून ते भारतीय व्यापार्‍याची केस लढवायला आले असल्यामुळे आजपर्यंत न उतरवलेली पगडी त्यांना उतरावी लागली.

डरबन शहरातून गांधीजींनी प्रिटोरिया शहरी जाऊन केस लढवायची होती. तेथे वरच्या दर्जाचे कोर्ट होते. प्रिटोरियाचा प्रवास त्यांना रेल्वेमधून करावा लागला. अब्दुल्लाशेठनी तार पाठवून त्यांची प्रिटोरिया शहरात व्यवस्था केली होती. त्यांना पहिल्या वर्गाचे तिकीटही काढून दिले होते. त्या प्रवासात रेल्वे गार्डने त्यांना पहिल्या वर्गाच्या डब्यातून गचांडी पकडून बाहेर टाकले ते त्यांच्या सामानासह. उच्च दर्जाचे शिक्षण काळ्या-गोर्‍या भेदापुढे कस्पटासमान होते. माणसा-माणसातला हा भेद गांधीजींनी अनुभवला. पुढे असेच प्रसंग दोन-चारदा घडले. भारतामधून आलेल्या लोकांना दक्षिण आफ्रिकेत किंमत दिली जात नसे. गोरे सर्व तर्‍हेच्या भारतीयांचा उल्लेख ‘कुली’ असा करीत. अर्थातच वकील या नात्याने गांधीजींचा उल्लेख ‘कुली वकील’ असा करण्यात येत असे. अपमान हरघडी सहन करावा लागल्यामुळे भारतीयांसाठी आपण काहीतरी ठोस कार्यक्रम घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे हा गांधीजींचा विचार त्याचवेळी पक्का झाला होता. दोन-तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर प्रथम भारतीयांची एक संघटना स्थापन करून सर्वांना एकत्र आणण्याचा विचार गांधीजींच्या मनात प्रबळ झाला. १८९४ च्या मे महिन्यात गांधीजींनी ‘नाताळ इंडियन कॉंग्रेस’ या संघटनेची स्थापना केली. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी कुली, हमाल, मजूर, घरगडी, स्वयंपाकी, कारकून आणि व्यापार्‍यांना या कॉंग्रेसच्यावतीने त्यांनी एकत्र आणले. त्यामुळे तेथील सर्व भारतीयांच्या अंगात उत्साह संचारला.

दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदी लोकांची परिस्थिती फारच वाईट होती. त्यांना काहीच अधिकार नव्हते. त्यांचे जीवन मुक्या जनावरांसारखे असायचे. गोर्‍या मालकांचा रोष ते ओढवून घेत. काही वेळा मारही खात. असाच एक स्वयंपाकी बालासुंदरम् एक दिवस रडत रडत गांधीजींच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. त्याच्या नाकातोंडातून रक्ताचे ओघळ वाहत होते. त्याने केलेल्या कोणत्यातरी अपराधामुळे त्याच्या गोर्‍या मालकाने त्याला यथेच्छ चोप दिला होता. ती मारहाण अमानुष होती. जुजबी उपचार केल्यानंतर गांधीजींनी रीतसर पोलीस तक्रार करायचे ठरविले. विचारांती तक्रारीचा परिणाम कायदेशीर होईल की नाही याची खात्री नव्हती. कारण सारे घरगडी आणि मजूर कंत्राटी पद्धतीवर नेमले जात. त्याच्या खिशात मालकाचे प्रमाणपत्र न सापडल्यास पोलीसच त्यांना मारहाण करीत. पोलिसांकडे जाऊनही अखेर बालासुंदरम्ला कॉन्ट्रॅक्ट सोडून दुसरीकडे जाणे अशक्य होते. काम करीत असलेल्या मालकाच्या परवानगीशिवाय दुसर्‍या गोर्‍या मालकाकडे हिंदी लोकांना नोकरीस राहण्याची सवलत नव्हती. तेव्हा गांधीजी स्वतः त्या गोर्‍या मालकाकडे गेले. त्यांची समजूत घालून त्यांनी मालकाकडून बालासुंदरम्‌साठी ‘नो ऑब्जेक्शन’ मिळवले.त्यानंतर दुसर्‍या गोर्‍या माणसाकडे त्याला कामाला ठेवले. या प्रसंगाची सर्व लहान-थोरांमध्ये फार चर्चा झाली. सर्वांनी गांधी हे आपले ‘तारणहार’ असे मानले.

दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदी लोक आल्यावर त्यांना वर्षाला २५ पौंड टॅक्स बसे. त्याशिवाय परदेशी म्हणून इतर लहान लहान रक्कमेचे टॅक्स द्यावे लागत. त्यांना हवे तेव्हा रस्त्यावरून फिरता येत नसे. रात्री नऊनंतर बाहेर पडायला बंदी होती. दिवसाचे रस्त्यावरून चालण्याचा अधिकार हिंदी लोकांना नव्हता. पैसेवाला हिंदी व्यापारी असला तरी सुद्धा तोच नियम. हिंदी लोकांच्या वस्त्या म्हणजे जवळ जवळ झोपडपट्‌ट्याच होत्या. पाणी टंचाई होतीच, इतरही अनेक कटकटी होत्या. ‘नाताळ इंडियन कॉंग्रेस’तर्फे विलायत सरकारला गांधीजींनी सर्व काही लिहून कळवले. अन्यायाविरुद्ध त्यांनी दाद मागितली. त्यासाठी हजारोंच्या सह्या घेऊन सरकार दरबारी अर्जही पाठवले. लोकप्रतिनिधींना साकडे घातले. ‘इंग्रज लोकांस विनंती’, ‘हिंदी लोकांना मताधिकार- एक विनंती’ अशी दोन छोटी पुस्तके गांधींनी इंग्रजीत छापून घेतली. त्याच्या हजारो प्रती कॉंग्रेसने वितरित केल्या. भारतातील सरकारी प्रतिनिधींना, व्हाईसरॉय यांना त्या पुस्तिकेच्या प्रती पोचवल्या. दक्षिण आफ्रिकेत सर्व गोर्‍या लोकांना व सुशिक्षितांनाही प्रती पाठवल्या. त्याचा बराच मोठा परिणाम झाला. हिंदी लोक गटागटाने जमून चर्चा करण्यास शिकले. त्यांच्यामध्ये गांधींमुळे धीटपणा आला. परिणामी टॅक्सचे शुल्क २५ वरून ३ पौंड इतके सरकारने कमी केले. दोन-दोन वर्षानी थोडी पगारवाढ पदरात पडली. त्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली चळवळ उभारली गेली. त्यात अनेकांनी प्राणही गमावले, बर्‍याचजणांना तुरुंगवासही भोगावा लागला. परंतु थोडा का होईना, न्याय मिळाला. मताधिकार देण्याचा विचार होईल असे आश्‍वासनही मिळाले.

गांधीजींना रात्री विचार करीत मोकळ्या हवेत फिरण्याची सवय होती. परंतु ते तसे फिरतानाही शेठ अब्दुल्ला किंवा इतर एखाद्या गोर्‍या मित्राचे शिफारसपत्र घेऊनच फिरायला जात. अनेकदा पोलिसांनी त्यांना खडसावले होते. एकदा सकाळी ते फुटपाथवरून चालत असताना हिंदी कुलीने नियमभंग केल्याचे कारण दाखवून एका पोलीस शिपायाने त्यांच्या कमरेत लाथ मारली होती. त्यांना आडवे पाडून चोपही दिला होता. त्यावळी अकस्मात तेथे आलेल्या एका गोर्‍या वकिलाने हा सर्व प्रकार पाहिला व गांधींना घेऊन तो पोलिसाविरुद्ध तक्रार देण्यास गेला. गांधीजी म्हणाले, ‘मला त्या पोलिसाचा राग नाही, तुमचा कायदा तसा आहे, तो बदला’ अधिकार्‍यांना कायद्याचा जाच समजला. पुढे गोर्‍या लोकांमध्येच चर्चा होऊन फुटपाथवरून चालण्याच्या कायद्यात बरेच बदल झाले. प्रत्येक प्रसंगाने गांधींची इज्जत आणि मानसन्मान दक्षिण आफ्रिकेत वाढतच गेला. वर्ष-दीड वर्षासाठी दक्षिण आफ्रिकेत आलेल्या गांधीजींना स्थायिक हिंदी लोक ते भारतात परतू नये म्हणून मनधरणी करीत असत. त्यांचा आणि गांधीजींचा जिव्हाळा एवढा वाढला होता की, गांधींनाही त्यांना सोडणे असह्य होऊन गेले. नाताळ इंडियन कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांनी हिंदी लोकांना स्वच्छता आणि चांगली वर्तणूक यांचे पाठ दिले. लोकांनी सत्याचा आग्रह धरावा, कधी खोटे बोलू नये अशी शिकवण दिली. गांधीजी ईश्‍वरनिष्ठ होते. परंतु, विशिष्ट धर्माला कवटाळून ते बसत नसत. सर्व धर्माचे वाचन केल्यावर त्यांना सर्व धर्मातच चांगलेपणा आढळून दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यातच सर्वधर्माची इज्जत सर्वांनी करावयास हवी या पक्क्या मताशी गांधीजी पोचले होते.

दक्षिण आफ्रिकेच्या वास्तव्यात गांधींनी कसलाही नाद लावून घेतला नाही. त्यांनी सिगरेट ओढण्याची सवय लावून घेतली. मांस-मत्स्याहारही केला नाहे. मद्य प्राशन केले नाही. स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवले नाहीत. शुद्ध वर्तनामुळे दक्षिण आफ्रिकेत ते काळे व गोरे या लोकात आदरणीय ठरले. पुढे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व टिळकानंतर गांधीजींकडे चालून आले. दक्षिण आफ्रिकेमध्ये अंगीकारलेले व्यक्तिगत शुद्ध जीवन देशातील चळवळीत तावून-सुलाखून अधिक देदीप्यमान झाले. देशाचा इतिहासात एवढा थोर नेता विरळाच!