दंतेवाडातील चकमकीत12 नक्षलवाद्यांचा खात्मा

0
13

तीन जवान शहीद, दोन जखमी, रायफल्ससह दारुगोळाही केला जप्त

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा-बीजापूर सीमेवर जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. याचवेळी, चकमकीत 3 जवान शहीद झाले असून 2 जखमी झाले
आहेत.

बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी. यांनी चकमकीत जवान हेड कॉन्स्टेबल मोनू वडारी, रमेश सोडी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे शहीद झाले असून दोन जवन जखमी झाले आहेत. गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात जवानांचे पथक सतत शोधमोहीम राबवत आहे.
बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून बीजापूर-दंतेवाडा सीमेवरील वेस्ट बस्तर डिव्हिजन परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली होती. जंगलात शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत नक्षलवादी ठार झाले.
मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी, आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. शूर जवानांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो असे म्हटले.
छत्तीसगडमध्ये 4 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि एनएसए डोवाल यांच्यासह अनेक मान्यवर डीजीपी परिषदेत सहभागी झाले होते. या बैठकीत नक्षलवाद संपवण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली होती. आता त्याचे परिणाम दिसत आहेत. मात्र, शहा यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत आधीच निश्चित केली आहे.

रायफल आणि दारूगोळाही जप्त
जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआर रायफल, 303 रायफल आणि दारूगोळाही जप्त केला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे. परिसर सील करण्यात आला आहे. बॅकअप पार्टीही पाठवण्यात आली आहे. शोधमोहीम अजूनही सुरू असून नक्षलवाद्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.