थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे

0
561
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य कोणते? निदिध्यास, निरलस वृत्ती, चिकाटी आणि समाजमनस्क वृत्ती. या सर्व गुणांना व्यापून राहिलेला साधेपणा आणि निःस्वार्थी वृत्ती. हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांची कीर्तिपताका भारतभर फडकली.

 

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्व प्रकारची प्रतिकूलता असतानाही काळाच्या मुशीतून अशी काही तेजस्वी माणसे निर्माण झाली की त्यांनी आपल्या देशाची भाग्यरेखा बदलली. राष्ट्रकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य, रंगभूमी, विविध कला आणि सांस्कृतिक क्षेत्र त्यांच्या कर्तृत्वाने उजळून निघाले. खरे पाहता या क्षेत्रात अनिरुद्ध संचार करायला त्यांना वावच नव्हता. परकीय सत्तेने एकीकडे एतद्देशीयांची ससेहोलपट चालविली होती. अशावेळी शिक्षणाचे आणि तेही राष्ट्रीय शिक्षणाचे असिधाराव्रत मनाशी बाळगून काही माणसे पुढे आली. ज्या काळात स्त्रीशिक्षणाचा नामोच्चार करणे निषिद्ध मानले जात असे, त्या काळात फुले दांपत्य पुढे सरसावले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रीशिक्षणाचे व्रत याच दृढ निष्ठेने पुढे चालविले. त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांची आपल्याला आज कल्पना येणे शक्य नाही. आपल्या कितीतरी पिढ्या अभावग्रस्ततेत, अज्ञानात खितपत पडल्या होत्या. विधवा स्त्रियांच्या हालअपेष्टा तर बघायलाच नकोत. अशावेळी एक धडाडीची व्यक्ती पुढे आली, ती म्हणजे धोंडो केशव कर्वे. ‘महर्षी’ ही उपाधी त्यांच्या कर्तृत्वाला साजेशीच होती. प्रेमादरामुळे ते सर्वांचे अण्णासाहेब कर्वे झाले. तेच नाव जनमानसात सर्वमान्य झाले. तीर्थरूप अण्णासाहेबांना आपला जन्मशताब्दिमहोत्सव ‘याचि देहिं याचि डोळां’ अनुभवायला मिळाला. हे भाग्य अवघ्याच व्यक्तींना प्राप्त होत असते. त्यानंतरही चार वर्षे ते हयात होते.

श्रेष्ठ समाजसेवक आणि स्त्रीशिक्षणाचे अग्रणी असलेल्या महर्षी कर्वे यांचा चरित्रपट थोडक्यात समजून घेणे जरूरीचे आहे. सुदैवाने त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र आज उपलब्ध आहे. त्यातून कोकणातील मुरूडपासून पुण्यापर्यंतचा त्यांचा पुढील प्रवास कसा झाला याची रोचक तशीच अंतर्मुख करणारी कहाणी वाचायला मिळते. धोंडो केशव कर्वे यांचा जन्म मुरूडजवळच्या शेरवली या गावी 18 एप्रिल 1857 रोजी झाला. त्यांचे वडील खोतांकडे कारकुनी करीत. आईवडिलांची काटकसरी वृत्ती, सोशिकपणा आणि निष्ठेने सेवा करण्याचा स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पुरेपूर उतरला होता. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुरूडला झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये आणि नंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांच्या अकराव्या वर्षीच वडिलांचे निधन झाल्यामुळे वडीलबंधूंचे त्यांना विद्यार्जनासाठी सहाय्य झाले. इ.स. 1884 मध्ये ते बी.ए. झाले. मुंबईत असताना आगरकरांच्या सुधारणावादी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. स्त्रीच्या उद्धाराशिवाय देशाचा विकास म्हणजे त्याची अर्धांगविगलित देहासारखी स्थिती असे आगरकरांचे मत होते. त्यामुळेच कदाचित महर्षी कर्वे यांच्या मनात भावी काळातील स्त्रीशिक्षणाचे बीजारोपण झाले असावे. 1891 मध्ये लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातील गणिताच्या प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला. महर्षी कर्वे तेथे गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांची प्रथम पत्नी राधाबाई यांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे 1893 मध्ये आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे या पंडिता रमाबाईंच्या ‘शारदा सदन’ या संस्थेतील विधवेशी त्यांनी विवाह केला. त्यांचे सहजीवन सुखाचे झाले. नव्या नोकरीमुळे छोट्या रघुनाथचे शिक्षण अण्णासाहेब पूर्ण करू शकले. हा रघुनाथ म्हणजे प्रख्यात क्रांतदर्शी प्रज्ञावंत आणि ‘समाजस्वास्थ्य’कार र. धों. कर्वे. अण्णासाहेबांची अन्य मुलेही कर्तृत्ववान होती.

या विधवाविवाहानंतर तत्कालीन समाजाने अण्णासाहेब कर्वे यांचा खूप छळ केला. त्यांनी तो निमूटपणे सहन केला. विधवाविवाहाच्या समस्येविषयी लोकमत जागृत व्हावे यासाठी त्यांनी वर्धा येथे ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळी’ची 1894 मध्ये स्थापना केली. नंतर या संस्थेचे नाव ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ असे करण्यात आले. विधवांच्या पुनर्विवाहाची चाल रूढ होईल तेव्हा होईल, पण निदान त्यांच्या शिक्षणाची तजवीज होणे ही काळाची गरज आहे हे रास्तपणे ओळखून त्यांनी ‘अनाथ बालिकाश्रम’ स्थापन केला. ‘हिंगणे आश्रम’ म्हणून ओळखली जाणारी ती हीच संस्था होय. या आश्रमाला स्वाश्रयी बनविण्यासाठी कर्वे यांनी जिवाचे रान केले. अनेक लोकोपवाद सहन केले. पण आपल्या ध्येयमार्गावरून ते विचलित झाले नाहीत. विधवांप्रमाणेच इतरत्र सर्वच मुलींच्या शिक्षणाची आबाळ होत आहे हे वास्तव चित्र त्यांनी पाहिले. यासाठी मार्च 1907 मध्ये पुण्याला महिला विद्यालयाची त्यांनी स्थापना केली. 1915 मध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना अण्णासाहेब कर्वे यांनी महिला विद्यापीठाची संकल्पना जाहीरपणे मांडली. तिला सर्वत्र पाठिंबा मिळाला. त्यांत रवींद्रनाथ टागोर, दीनबंधू अँड्र्यूज, अ‍ॅनी बेझंट, एच. ए. एल. फिशर, न. चिं. केळकर, श्रीनिवासशास्त्री, कस्तुरीरंग अय्यंगर, विल्यम वेडरबर्न आणि महात्मा गांधी आदी श्रेष्ठ असामी होत्या. याही काळात संवाद-संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ठामपणे उभे राहावे लागले. त्याचा तपशील जाणून घेणे आवश्यक आहे.

1914 साली कर्वे फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त झाले होते. त्यांनी आपले पुढील आयुष्य स्त्री-शिक्षण आणि समाजसुधारणा यांसाठी वाहून घेतले.

महिला विद्यापीठासाठी अण्णासाहेब कर्वे यांनी आफ्रिकेतील डॉ. लांडे, बंगालचे बाबू शिवप्रसाद गुप्त, विठ्ठलदास ठाकरसी, मूळराज खटाव अशा व्यक्तींकडून मोठमोठ्या रकमेच्या देणग्या मिळविल्या. 1921 ते 1927 या काळात सर्वत्र हिंडून वीस हजार व्यक्तींकडून हजारो रुपयांच्या देणग्या त्यांनी मिळविल्या. युरोप, अमेरिका, आशिया व आफ्रिका या खंडांचा दौरा करून बावीस देशांमध्ये शेकडो व्याख्याने देऊन महिला विद्यापीठासाठी असाच निधी त्यांनी जमविला. प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, समाजशास्त्र, बालमानसशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र, चित्रकला, गायन आणि वादन असे महिलांना उपयुक्त असलेले विषय शिकविण्याची सोय व्हावी, इंग्रजीचे वाजवीपेक्षा जास्त स्तोम माजू नये आणि मातृभाषेला प्रतिष्ठेचे स्थान मिळावे असा कटाक्ष या विद्यापीठात सुरुवातीपासून बाळगला गेला. या महिला विद्यापीठाशी अनेक महाविद्यालये संलग्न करण्यात आली. आज हे महिला विद्यापीठ मुंबईला ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ या नावाने कार्यरत आहे. हिंगणे आश्रमाच्या शाखाही सोलापूर, धुळे आणि सातारा या ठिकाणी सुरू करण्यात आल्या. ग्रामीण परिसरातील साक्षरतेसाठी कर्वे यांनी ‘महाराष्ट्र ग्रामीण प्राथमिक शिक्षणसंस्था’ स्थापन करून या संस्थेतर्फे अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या. “देशाच्या नवनिर्मितीत स्त्रियांचा सहभाग हवा असेल तर स्त्री स्वकर्तव्य पार पाडण्यास समर्थ बनली पाहिजे आणि त्यासाठी त्यांना वेगळे शिक्षण देण्याची गरज आहे,” हे एका जपानी विचारवंताचे मत कर्वे यांना पटलेले होते. भारतीय स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हे अत्यंत पवित्र देशकार्य-धर्मकार्य आहे अशी भावना अंतःकरणात बाळगली तर स्त्रीशिक्षणाचा प्रश्न सुटण्याची आशा आहे असे त्यांना वाटे. त्यांच्या ध्यासाला प्रयत्नांची जोड मिळाली. त्यांची ध्येयपूर्ती झाली. सहस्रावधी स्त्रियांच्या भवितव्याचा मार्ग त्यांच्या प्रयत्नांमुळे खुला झाला.

महर्षी कर्वे यांनी शिक्षणप्रसार- आणि त्यातही स्त्रीशिक्षणप्रसार- हे आपले जीवितध्येय मानले असले तरी सर्वंकष सामाजिक सुधारणेकडे त्यांनी मुळीच दुर्लक्ष केले नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी सामाजिक समतेचा ध्यास बाळगला. जातिभेद नाहीसा व्हावा याकरिता त्यांनी ‘समता मंचा’ची स्थापना केली. सर्व पातळ्यांवर नागरिकांना समता अनुभवता आली पाहिजे; अन्यथा मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ तो काय असे त्यांना वाटे. समाजाच्या निंदेची पर्वा न करता पण त्याचबरोबर कुणालाही न दुखविता त्यांनी समाजसुधारणेच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. हे त्यांचे कार्य काहीसे अलक्षित राहिले.

आयुष्याच्या पूर्वार्धात अण्णासाहेब कर्वे यांनी खूप कष्ट उचलले. खस्ता खाल्ल्या. पण आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना समाजमान्यता मिळाली. बनारस, पुणे, एस.एन.डी.टी. आणि मुंबई या नामवंत विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटची सन्माननीय पदवी देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. भारत सरकारने 1955 मध्ये ‘पद्मविभूषण’ ही उपाधी देऊन त्यांचा सन्मान केला. 1958 साली त्यांच्या जन्मशताब्दीचा सोहळा भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत झाला. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने टपाल तिकीट काढण्यात आले. 1958 मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले.

महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य कोणते? निदिध्यास, निरलस वृत्ती, चिकाटी आणि समाजमनस्क वृत्ती. या सर्व गुणांना व्यापून राहिलेला साधेपणा आणि निःस्वार्थी वृत्ती. हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांची कीर्तिपताका भारतभर फडकली.