थोडी वाट पाहू

0
10

अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेने केवळ आपला देशच नव्हे, तर जागतिक हवाई वाहतूकक्षेत्र हादरून गेले आहे. ह्या विमान दुर्घटनेसंबंधी अगणित तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. खरे तर ह्या दुर्घटनाग्रस्त विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर हे दोन्ही सापडले असल्याने त्यातील माहितीच्या विश्लेषणानंतर दुर्घटनेचे खरे कारण समोर येईल. परंतु लोकांना तेवढाही धीर धरवत नाही. जो तो स्वतःला वाट्टेल तसे निष्कर्ष काढून मोकळा होताना दिसतो. काहींनी एअर इंडियाला दोषी धरले, काहींनी वैमानिकांची चूक ठरवली, तर काहींनी थेट बोईंग कंपनीला जबाबदार धरले. ह्या विमान दुर्घटनेतील मोठ्या प्राणहानीने सगळे हादरले आहेत. शिवाय विमान उड्डाण करतानापासून दुर्घटनेपर्यंतचा त्याचा संपूर्ण प्रवास व्हिडिओवर चित्रीत झालेला असल्याने अवघ्या तीस सेकंदांत होत्याचे नव्हते झाल्याचा धक्काही मोठा आहे. सर्वसामान्य विमानोड्डाणाप्रमाणे धावपट्टीवरून उड्डाण घेणारे हे विमान 11 सेकंदांत वर झेपावताच पुढील 30 सेकंदांत आपली शक्तीच गमावून बसते आणि बघता बघता खालील इमारतीवर कोसळते हे दृश्यच कल्पनेच्या पलीकडेच आहे. त्यामुळे विशेषतः विमानप्रवास करणाऱ्यांना त्या दृश्याने पुरते हादरवून सोडले आहे. विमान दुर्घटनाग्रस्त होताना उठलेला तो प्रचंड अग्नीलोळ, सव्वा लाख लिटर अतिज्वलनशील इंधनाने घेतलेला पेट, त्यामुळे वाढलेले प्रचंड तापमान आणि त्यात मानवी देहांची झालेली राखरांगोळी, ओळख पटवण्यापलीकडे गेलेले, अक्षरशः छिन्नविच्छिन्न झालेले, शब्दशः कोळसा बनलेले मृतदेह, त्यांची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांची डीएनए चाचणी करण्याची आलेली पाळी हे सगळेच सुन्न करणारे आहे. मात्र, ह्या दुर्घटनेनंतर झालेले वेगवान मदतकार्य, सरकार आणि एअर इंडियाकडून दाखवली गेलेली संवेदनशीलता आणि तत्परता ह्याबाबत कोणाला तक्रार करायला जागा राहिलेली नाही. प्रश्न उरला आहे तो केवळ दुर्घटनेमागील कारणाचा. विमानोड्डाण करताना त्याचे लँडिंग गियर खालीच का राहिले, पंख विस्तारीत स्थितीत आहेत की दुमडलेल्या स्थितीत ह्यावर बऱ्याच चर्चा वृत्तवाहिन्यांवरून झडल्या. काही तर त्याला वैमानिकाची चूक ठरवूनही मोकळे झाले. लँडिंग गियर वर उचलण्याऐवजी वैमानिकांनी पंख उचलले इथपासून ते एक इंजिन बंद पडताच वैमानिकाने चुकून दुसरे इंजिनही बंद केले इथपर्यंत तर्कटे लढवली गेली आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानाचे वैमानिक आठ हजारांवर अधिक तास विमानोड्डाणांचा अनुभव असलेले होते ह्या वस्तुस्थितीकडेही ह्यात दुर्लक्ष केलेले दिसते. वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरला पाठवलेल्या ‘मे डे’चा संदेशात ‘उ ड्डाणात जोर नाही, शक्ती कमी होत आहे, विमान उचलता येत नाही, खाली चालले आहे’ असे सांगितले अशी माहिती उपलब्ध झाली आहे. म्हणजेच ह्या बोईंग ड्रीमलायनर विमानाची दोन्ही इंजिने पुरेशा क्षमतेने काम करेनाशी झाली असा अर्थ होतो. त्याच्या संभाव्य कारणांमध्ये पक्ष्यांची दोन्ही इंजिनांना एकाचवेळी धडक बसलेली असावी इथपासून ते इलेक्ट्रॉनिक किंवा सॉफ्टवेअर प्रणालीतील बिघडामुळे ही इंजिने बंद पडली का, विमानाच्या इंधनात भेसळ होती का, इथपर्यंत अनेक कारणांची चर्चा झाली. काहींनी बोईंग कंपनीलाच दोष दिला. बोईंगच्या ‘बोईंग मॅक्स’ सारख्या विमानांच्या पूर्वी भीषण दुर्घटना झालेल्या असल्या आणि त्या कंपनीची अमेरिकेत सरकारकडून चौकशीही झाली असली तरी बोईंग ड्रीमलायनर 787 ची ही पहिलीच दुर्घटना आहे. काही झाले तरी हे एक अत्याधुनिक विमान मानले जाते. वैमानिकही अनुभवी होते. मग असे काय घडले की हे विमान असे बघता बघता दुर्घटनाग्रस्त झाले? अर्थात, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता किंवा आपले ज्ञान न पाजळता थोडा धीर धरणेच उचित होईल. जोपर्यंत अधिकृतरीत्या ह्या दुर्घटनेच्या कारणांसंबधीची माहिती उघडकीस येत नाही तोवर कोणत्याही निष्कर्षाप्रत जाणे पूर्णतः चुकीचे व अन्यायकारकर ठरेल. एअरक्राफ्ट ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो म्हणजेच एएआयआरकडून ह्या दुर्घटनेची चौकशी होणार आहे. बोईंग ही अमेरिकी कंपनी असल्याने यूएस नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) मार्फतही त्याची स्वतंत्र चौकशी होणार आहे. भारत सरकारच्या गृह सचिवांच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशीची घोषणाही हवाई वाहतूकमंत्र्यांनी केलेली आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्वतंत्र चौकशांतून ह्या भीषण विमान दुर्घटनेच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल आणि अशा प्रकारच्या दुर्घटना भविष्यात घडू नयेत ह्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सर्व संबंधितांना पावले उचलता येतील आणि विमानप्रवासाच्या सुरक्षिततेबद्दलच्या विश्वासाला जो तडा गेला आहे तो दूर होईल अशी आशा करूया.