26 C
Panjim
Tuesday, September 21, 2021

थैमान

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील दोन भीषण बॉम्बस्फोटांतील बळींची संख्या शंभरी पार करून गेली आहे. अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर अफगाणिस्तानात काय वाढून ठेवलेले आहे ह्याची नांदीच जणू ह्या स्फोटांनी घडविली आहे. खरे तर अशा प्रकारे विमानतळावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो ह्याची पूर्वसूचना अमेरिकेला स्वतःच्या तसेच ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या गुप्तचर यंत्रणेकडून स्पष्टपणे मिळाली होती. त्या देशांनी आपल्या नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्यासही त्यासाठीच सांगितलेले होते. असे असूनही हे स्फोट घडले. ह्या स्फोटांची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट – खोरासान’ ने स्वीकारली आहे. इराक आणि सिरियामधून महत्प्रयत्नांती नायनाट झालेल्या इस्लामिक स्टेटचे हे पुनरागमन जगाला नव्या धोक्यांचा इशारा देणारे आहे.
खरे तर ‘आयसिस’ पूर्णांशाने कधी नष्ट झालेलीच नाही. विविध नावांनी आणि विविध रुपांनी जगाच्या कानाकोपर्‍यांत ती कुठे ना कुठे कधी ना कधी डोेके वर काढतच राहिली आहे. काबूल स्फोटांमुळे जी आयएस – खोरासान चर्चेत आली आहे, ती अफगाणिस्तानात आजवर अधूनमधून अमेरिका आणि नाटो फौजांवर हल्ले चढवीतच होती. अफगाणिस्तानातून अल कायदा आणि आयसिस जवळजवळ नष्ट झालेली आहे असा दावा जरी अमेरिका करीत आली असली, तरी प्रत्यक्षात सध्या ज्या प्रकारे हे दोन भीषण स्फोट घडविले गेले ते पाहता येणार्‍या काळात तालिबानपेक्षाही कडव्या इस्लामी शक्ती अफगाणिस्तानमध्ये प्रबळ होण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे.
तालिबानने जेव्हा अमेरिकेशी हातमिळवणी सुरू केली आणि दोहा करार झाला, तेव्हा त्याला आयएस- खोरासानने जाहीरपणे विरोध दर्शवला होता. अमेरिकेच्या प्रभावाखाली येऊन तालिबान मवाळ होईल असे वाटल्याने स्वतः अधिक कडव्या रुपामध्ये अफगाणिस्तानात पाय रोवण्यासाठी ती आता उतावीळ झालेली दिसते. प्राचीन खोरासानमध्ये आताचा अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आदींचा समावेश होता. त्यामुळे केवळ अफगाणिस्तानपुरते स्वतःला सीमित न ठेवता, ह्या सगळ्या प्रांतामध्ये कडवी इस्लामी राजवट प्रस्थापित करणे हे ह्या दहशतवादी संघटनेचे स्वप्न आहे. तेथेच तालिबानशी त्यांचा संघर्ष आहे. अमेरिकेच्या पळपुट्या कारभारात सध्या आपल्याला डोके वर काढण्याची संधी दिसल्याने हे बॉम्बस्फोट घडवून देऊन आपले अस्तित्व ह्या कडव्या संघटनेने दाखवून दिले आहे.
आयएस- खोरासान म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान, हक्कानी नेटवर्कमधील दहशतवाद्यांचाच हा मेळा आहे. सात वर्षांपूर्वी अबु बकर अल बगदादीच्या नेतृत्वाखाली ही मंडळी या संघटनेच्या नावाखाली एकत्र आलेली होती. पाकिस्तानात काही भीषण हल्ले चढवल्यानंतर तेथे लष्कराने मोहीम उघडली. तेव्हा ह्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात आश्रय घेतला होता. आता तालिबानप्रणित सरकार सत्तारूढ होत असताना आपले अधिक कडवे अस्तित्व दाखवून देऊन उद्या गरज भासली तर तालिबानवरही वरचढ होऊन स्वतःची खिलाफत स्थापन करण्यास हे दहशतवादी मागेपुढे पाहणार नाहीत.
काबूल विमानतळावरील स्फोटाचे लक्ष्य अमेरिकेला गेल्या वीस वर्षांत मदत करणारे अफगाणी नागरिक आणि अमेरिकी सैनिक होते असे आयएस- खोरासानने आपल्या निवेदनात म्हटले आहे. म्हणजेच एकीकडे तालिबानचा कहर चालला असताना दुसरीकडे ह्या असल्या राक्षसांचाही सामना करायचा असल्याने हजारो अफगाण नागरिक परवा एवढे भीषण स्फोट होऊनही काल पुन्हा एकवार हजारोंच्या संख्येने विमानतळावर जमलेले दिसले, त्यामागे हीच हताशा आणि हतबलता आहे.
काबूल स्फोटांनंतर पुन्हा तोंडघशी पडलेले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी एखाद्या चित्रपटाप्रमाणे ‘‘वी विल नॉट फरगिव्ह, वी विल नॉट फर्गेट, वी विल हंट यू डाऊन अँड मेक यू पे’’ असा डायलॉग फेकला असला तरी प्रत्यक्षात आज हे जे सगळे अराजक अफगाणिस्तानात निर्माण झालेले आहे, हा जो दहशतीचा नंगानाच सुरू झालेला आहे, त्यामागे अमेरिकेची अत्यंत बेजबाबदार आणि आपमतलबी वृत्तीच कारणीभूत आहे. तालिबानचे पुनरुज्जीवन आणि आयसिसचे अफगाणिस्तानातील अवतरणे ही केवळ त्या देशापुरती समस्या नाही. ही भारतीय उपखंडापुरती समस्याही नव्हे. ही उद्या संपूर्ण जगासाठी एक अक्राळविक्राळ समस्या बनून राहणार आहे. त्याचे भीषण परिणाम अगदी अमेरिकेवरही अटळ आहेत. अल कायदाच्या मागावर जात अमेरिका अफगाणिस्तानात घुसली होती. आता तेथून काढता पाय घेत असताना आयएसचे हे नवे राक्षस ती कसे मागे ठेवून जाऊ शकते? आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरुद्धची आपली रणनीती पुन्हा एकदा स्पष्ट करावी लागेल. तालिबानला वठणीवर आणावे लागेल. आयसिसचे उभरते डोके वेळीच ठेचावे लागेल. अन्यथा नवा आत्मविश्वास लाभलेली ही रानटी माणसे संपूर्ण जगाला असुरक्षित बनवतील.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

सुधाकर रामचंद्र नाईक ‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन...

ताण, तणाव आणि आपण

गिरिजा मुरगोडी तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट...

मुंगी ः एक किमयागार

अंजली आमोणकर नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा...

विमा उद्योगाचे खाजगीकरण

शशांक मो. गुळगुळे अलीकडे केंद्र सरकारकडून खाजगीकरणाबाबत बर्‍याच क्रांतिकारक घोषणा करण्यात आल्या. विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून याला...

कॅप्टन पदच्युत

राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन...

ALSO IN THIS SECTION

कॅप्टन पदच्युत

राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन...

फडणवीस आजपासून गोवा दौर्‍यावर

>> निवडणूक सहप्रभारी रेड्डी व प्रभारी सी. टी. रवीही येणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते...

गोव्याला येत्या १९ डिसेंबरपूर्वी स्वयंपूर्ण बनवणार ः मुख्यमंत्री

>> ‘सरकार आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ येत्या १९ डिसेंबरपूर्वी म्हणजेच गोवा मुक्तिदिनाच्या ६० व्या वर्धापनदिनापूर्वी गोवा स्वयंपूर्ण बनवण्याचे उद्दिष्ट...

आजपासून ५० टक्के क्षमतेने कॅसिनो, मसाज पार्लर्स सुरू

>> सरकारचा आदेश जारी कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद असलेले कॅसिनो, स्पा, जलक्रीडा व जलसफरी, मसाज पार्लर्स, वॉटर पार्कस्,...

राज्यात सर्दी व तापाची साथ

>> लहान मुलांसह प्रौढांनाही बाधा राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असतानाच आता राज्यातील लहान मुलांसह प्रौढांमध्येही सर्दी व तापाची साथ...