यावेळी तारा केरकर म्हणाल्या की खरे म्हणजे या हायस्कूलने पीडित मुलीने दाखविलेल्या धाडसाबद्दल कौतुक करायला हवे होते. तिला विद्यार्थ्यांपुढे नेऊन आपल्या संरक्षणासाठी जो प्रतिकार करून दोन पुरुषांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली याचा अभिमान हायस्कूलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर ठेवायला हवा होता. तसेच विद्यार्थीनीवर असा आघात झाल्यास त्यांनीही असेच धाडस दाखवून आपले संरक्षण करायला हवे. असे सांगायला पाहिजे होते. उलट या हायस्कूलच्या प्राचार्यांनी त्या मुलीला तू आमच्या हायस्कूलची बदनामी केलीस, तू हायस्कूलमध्ये येऊ नकोस म्हणून बजावले हे योग्य नसल्याचे केरकर म्हणाल्या.
ज्यावेळी त्या मुलीवर संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हा आघात झाला त्या घटनेपासून ती विद्यार्थीनी भांबावून गेली होती. त्यातूनही तिने आपली सुटका केली. हायस्कूलने तिला शाबासकी द्यायला हवी होती. पण हायस्कूलची बदनामी केली म्हणून हायस्कूलात येऊ नकोस असा इशारा दिल्याचे केरकर म्हणाल्या. काल सकाळी आपण त्या शाळेच्या परिसरात फिरून पाहिले असता त्या शाळेच्या परिसरात घनदाट झाडे वाढलेली असल्याचे दिसून आले. कोणी आतमध्ये शिरल्यास कळू शकणार नाही. या परिसराची साफसफाई स्थानिक पंचायतीने करावी अशी मागणी आपण आपल्या सोबत असलेल्या स्थानिक सरपंच, पंचसदस्य यांच्याशी चर्चा केली. यावेळी पालकही उपस्थित होते. पुढे केरकर म्हणाल्या, आपण त्या मुलीची चौकशी केली असता त्या मुलीने घडलेली हकीगत सांगितली. ती सांगताना त्या मुलीने त्या संशयितांनी आपले दप्तर ओढून घेतले, त्यातील एका वहीमध्ये तीनशे रुपये होते तेही लंपास केले व वहीची पाने फाडल्याचेही तारा केरकर यंानी सांगितले.
म्हापसा पोलिसांनी प्रसाद गजोसाब गुप्ता (२१) भिहरडी-कुदकर्मा, झारखंड या संशयितास रात्री उशिरा अटक केली होती. तर काल मध्यरात्री सापळा रचून केतन चंद्रकांत मातोंडकर (२५) शिरोडा मार्केटजवळ (सिंधुदुर्ग) याला त्याच्या निवासस्थानी जाऊन अटक केली. या दोघांनाही काल सांयकाळी म्हापसा न्यायालयासमोर उभे केले असता दोन्ही संशयितांना सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नकांत कळंगुटकर, विश्वजित चोडणकर तपास करीत आहेत. या दोन्ही संशयितांना पकडण्यास वरील अधिकार्यांसोबत आल्वीटो डिमेलो व मंगेश तासोडेकर यांनी काम पाहिले.