मणिपूरमध्ये १७ व्या आसाम रायफल्सच्या जवानांकडून मणिपुरी महिलांवर अत्याचार होत असल्याचा आरोप मणिपुरी मानवी हक्क कार्यकर्त्या इमा गाम्बी यांनी ‘थिंकफेस्ट’ महोत्सवात काल केला. लष्करी अत्याचारांविरुद्ध तेथील महिलांनी नग्न होऊन केलेल्या निदर्शनांचे नेतृत्व करणार्या गाम्बी यांनी लष्करी अत्याचारांबाबत माहिती दिली. एक महिला असल्याने आम जनतेपुढे नग्न होणे सोपे नव्हते, पण नागरी हक्कांबाबत जागृती घडवणे आवश्यक होते असे त्यांनी सांगितले.
मानवी हक्कांसाठी लढणार्या इराणी साहित्यिक हनीफा झंगाना, गोलशीफ्ते फराहनी, इमा गाम्बी, बिनालक्ष्मी नेप्राम व कॅरोलीन फोरेस्ट यांनी महिला हक्कांसंदर्भातील ‘नेकेड रेजः ऑक्युपाइड टेरटरीज, वूमन अँड द बॉडी ऍज अ वेपन’ या सत्रामध्ये चर्चेत भाग घेतला.
अमेरिकेने २००३ साली कब्जा केलेल्या इराकमधील स्त्रियांची व्यथा लेखिका हनीफा झंगाना यांनी मांडली. इराणची लोकप्रिय अभिनेत्री गोलशीफ्ते फराहनी हिने एका फ्रेंच वृत्तपत्रासाठी दिलेल्या आपल्या नग्न छायाचित्रासंदर्भात उद्भवलेल्या प्रतिक्रियांसंबंधी माहिती दिली. आपल्या कुटुंबियांना धमक्या दिल्या गेल्या व जेव्हा आपण देश सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा इराणमधील सनातनी शक्तींविरुद्धच्या लढ्याचे ते प्रतीक ठरले असे त्यांनी सांगितले.
ईशान्येकडील राज्यांत हिंसाचारात पुरूष मारले गेले असता त्यांच्या स्त्रियांच्या होत असलेल्या हालांची माहिती बीनालक्ष्मी नेप्रम यांनी दिली. त्या मणिपुरी वूमन गन सर्व्हायव्हर्स नेटवर्कच्या नेत्या आहेत.