गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला राज्यातील खाण उद्योग येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्यात येणार असून त्यासाठीचे आवश्यक ते सर्व सोपस्कार लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. या पार्श्वभूमीवर पर्रीकर यानी काल बार्ज मालक, ट्रक मालक, खाण मालक व बँकांचे अधिकारी यांची बैठक घेऊन चर्चा केली.
दरम्यान, खाण संबंधी एकूण कर्जाची रक्कम हजारभर कोटी रुपये असल्याचा अंदाज पर्रीकर यांनी व्यक्त केला. तरी निश्चित आकडा शोधून काढावा, अशी सूचना त्यांनी उपस्थित बँक अधिकार्यांना केली.
खाण धोरण मसुदा
राज्याचे खाण धोरण मसुदा तयार करण्याचे काम चालू असल्याचे सांगून पुढील महिन्याच्या तिसर्या आठवड्यात हा मसुदा तयार होणार आहे. हा मसुदा जनतेच्या सूचनांसाठीही खुला ठेवण्यात येईल तसेच त्यावर विधानसभा अधिवेशनातही चर्चा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
खनिज ई लिलाव
खनिज मालाचा ई लिलाव पुन्हा सुरू करण्यात येणार असून तो जुलै महिन्याच्या अखेरीस अथवा ऑगस्टच्या आरंभी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
सरकारकडून सवलतींचे पर्याय
सरकारने खाण व्यवसायातील ट्रक मालक, मशिन मालक व बार्ज मालक यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जावर काही प्रमाणात सवलत देण्याचे ठरविले असून त्यासाठी विविध पर्याय ठेवल्याचे दक्षिण गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रक मालक संघटनेचे सचिव सत्यवान गावकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून ट्रक मालकांना काही आर्थिक पॅकेज मिळणार आहे काय या प्रश्नावर सध्या तरी कोणतीच माहिती नसल्याचे ते म्हणाले. सध्या गोवा अर्बन बँक व व्ही.पी.के अर्बन क्रेडिट सोसायटीला मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली असून सर्व ट्रक मालकांनी आपापल्या संबंधित बँकांत जाऊन व्यवस्थापकांना याची माहिती द्यावी व ते कोणती सवलत देणार आहेत याची माहिती काढावी असे गावकर म्हणाले. या संदर्भात काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी क्रेडीट सोसायटी, सहकारी बँका व इतर आर्थिक संस्था यांच्याशी त्याचप्रमाणे ट्रक मालक, बार्जमालक व मशिनरी मालक संघटनाच्या पदाधिकार्यांशी बैठक घेऊन वरील प्रस्ताव ठेवला आहे. या पत्रकार परिषदेला संयुक्त सचिव लक्ष्मण देसाई, खजिनदार कायतान फर्नांडिस, उपखजिनदार मायकल फर्नांडिस, किशोर गावस देसाई उपस्थित होते.

