- राजेंद्र पां. केरकर
वाढत्या उष्णतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी नैसर्गिक वृक्षाच्छादनाचे, वाहत्या जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची नितांत गरज आहे. हवामानात उद्भवणाऱ्या परिवर्तनाचा कानोसा घेऊन, आम्ही प्राधान्यक्रमाने त्याला सामोरे जाण्याची सिद्धता केली नाही तर त्याचे दुष्परिणाम आमच्या अस्तित्वावर घाला घालतील.
हवामानबदल आणि तापमानवाढीच्या संकटाखाली आज संपूर्ण जग संत्रस्त होत चालले आहे. एका बाजूला शीतलहरीचे संकट, तर दुसऱ्या बाजूला तप्त उन्हाच्या झळा सजीवमात्रांचे जगणे हैराण करीत आहे. अरबी सागराच्या किनारपट्टीवर वसलेले गोवा राज्य दमट हवामानाला सामोरे जात असून, गेल्या काही वर्षांपासून तापमानवाढीच्या संकटामुळे इथल्या लोकांचे जगणे असह्य झाले आहे. सध्या गोव्यात ग्रीष्म ऋतूचा कहर सुरू असून दिवसभर उन्हाच्या तप्त झळा माणसांबरोबर समस्त प्राणिमात्रांचे जीवन हैराण करू लागल्या आहेत. पावसाळ्याचे कोंदट वातावरण निर्माण होऊन, पराकोटीचा उष्मा वाढला असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांबरोबर बागायतदारांनाही बसला आहे. देशाच्या बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून तिथल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला अन्नाचा घास हिरावून घेतला आहे. गोव्याप्रमाणेच शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटकातही प्रचंड उकाडा असून तप्त उन्हाच्या झळा सर्वांग भाजून काढत आहेत. ज्या ठिकाणी अरबी सागर आहे, तिथे तप्त उन्हाबरोबर हवेतला दमटपणा लोकांचे जगणे असह्य करू लागला आहे.
पराकोटीच्या या उष्म्यामुळे पिके करपून कुचकामी ठरू लागली आहेत. प्रचंड उष्म्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनता हैराण झाली असून वातानुकूलित यंत्रणांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे वीजभारावर परिणाम होत असून असह्य ताणापायी वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उष्म्यामुळे जंगलांना आगी लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वृक्षवेलींचा ऱ्हास होऊन पशुपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास संकटात आला आहे. उष्णता आणि सूर्यप्रकाश यांचे मानवी शरीरावर दुष्परिणाम जाणवत आहेत.
आपल्या सरासरी तापमानात जेव्हा पाच डिग्री सेल्सिअसने वाढ होते तेव्हा उन्हाच्या तप्त झळा दुष्परिणाम निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. इ.स. 1900 साली वाढत्या तापमानाचे संकट तीव्र होत चालल्याची जाणीव झाली. उष्णतेच्या प्रकोपामुळे आबालवृद्धांबरोबर आजारी लोकांना आरोग्याच्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उष्णतेच्या प्रकोपामुळे हात-पाय सुजण्याचे, पोटात जळजळ, सतत घाम येण्याच्या प्रमाणात वाढ होऊन आरोग्याची समस्या जटिल होऊ लागली आहे. वाढत्या तापमानामुळेे मधुमेह व हृदयविकाराच्या रुग्णांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पश्चिम किनारपट्टीवरील गावांत उष्णता, दमटपणा आणि तप्त उन्हामुळे सजीवमात्रांचे जीवन संकटग्रस्त झालेले आहे
उन्हाळा आला की दरवर्षी अमेरिकेत सुमारे सहा-साडेसहा हजार लोकांना उष्माघात आणि तत्सम आजारांमुळे इस्पितळात दाखल करावे लागते. 2003 साली युरोपातल्या बऱ्याच राष्ट्रांत उष्माघाताने अक्षरशः थैमान घातले होते. त्यात सुमारे 80 हजार लोक मृत्युमुखी पडल्याचे उघडकीस आले. यापूर्वी अमेरिकेतल्या शिकागो शहरात उष्माघातामुळे उद्भवलेल्या आजारातून 739 लोक मरण पावले होते, तर जून 2015 मध्ये पाकिस्तानातल्या कराची शहराचा पारा बराच चढला होता, त्यात सुमारे 2000 लोक मरण पावले होते. जून 2015 मध्ये कराचीत तापमान 49 डिग्री सेल्सिअस झाले होते. उष्माघाताची समस्या जगाला गेल्या अर्धशतकापासून सतावत असली तरी आज उष्माघातामुळे मृत्युमुखी आणि आजारी पडणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. उष्माघाताप्रमाणे दुसऱ्या बाजूला शीतलहरीचाही प्रकोप मानवी जीवनाला सतावत असून त्यातही मृत्यू पावणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे.
आपला देश उष्ण कटिबंध प्रदेशात येतो. इथल्या किनारपट्टीवरच्या प्रदेशाला- एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या बंगालच्या उपसागरामुळे- वाढत्या उष्णतेबरोबर दमटपणामुळे जगणे असह्य होऊ लागले आहे. यंदा गोव्यात एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत उष्माघाताचा कहर चालू आहे. उष्णतेच्या प्रकोपामुळे यंदा भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील मनुष्य आणि अन्य प्राणिमात्रांचे जीवन संकटात सापडले आहे. भारत आणि पाकिस्तानात जेव्हापासून उष्माघाताची नोंद करण्यास प्रारंभ झाला, तेव्हापासून आतापर्यंतचा कालखंड हा सर्वाधिक उष्ण असल्याची नोंद होत आहे.
हवामानात उष्णता, दमटपणा वाढत असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगण्याची पाळी सर्वसामान्यांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी तामिळनाडूची राजधानी चेन्नई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा तलाव कोरडा पडत असून, ही परिस्थिती आता बऱ्याच ठिकाणीही पाहायला मिळत आहे. राजस्थानातल्या चुरू येथे तर तापमानाने 50.8 डिग्री सेल्सिअसचा टप्पा बऱ्याच वेळा गाठलेला आहे, यावरून गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात उष्णतेची लाट किती प्रखर होत चालली आहे याची कल्पना येते. आपल्या देशातच नव्हे तर जगातल्या बऱ्याच ठिकाणी उष्णतेच्या लाटा थैमान घालत आहेत.
आज महासागर गरम होऊ लागले आहेत. मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वृक्षाच्छादन नष्ट होऊ लागले आहे. जलस्रोतांचे बाष्पीकरण होण्याची प्रक्रिया गतिमान झाल्याने लहरी पर्जन्यवृष्टी, ढगफुटीसारखे प्रकार माणसाचे जगणे संकटग्रस्त करू लागले आहेत. नदीनाले, तलाव कोरडे पडू लागले आहेत आणि त्यामुळे पेयजल आणि सिंचनाची समस्या सर्वत्र वाढू लागली आहे. दिवसेंदिवस देशाचा बराच भाग दुष्काळाची शिकार होऊ लागला आहे. उष्णतेच्या लाटेच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्या देशात अपवादात्मक पूर्वतयारी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे धरणे, पाटबंधाऱ्यांची लक्षणीय संख्या असूनही सिंचनाच्या पाण्याअभावी ते कोरडे पडण्याची पाळी येत आहे. पिण्याचे पाणी दिवसेंदिवस जलस्रोतांतून गायब होण्याचे तसेच प्रदूषित होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे.
उष्णतेच्या लाटेचे दुष्परिणाम केवळ निसर्ग आणि पर्यावरणावरच होत नसून, त्याचे सामाजिक आणि मानसिक परिणामही प्रकषनि जाणवत आहेत. उष्णतेने जेथे कहर केलेला आहे तेथे हिंसक, गुन्हेगारी कृत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मानसिक ताणतणावात झालेल्या वाढीपायी जगण्यात निरुत्साहीपणा जाणवल्याने आत्महत्यांची संख्याही वाढत चालली आहे. वाढत्या उष्म्यामुळे काम करण्याच्या क्षमतेरवरही दुष्परिणाम दिसन येत आहे. सामाजिक, जातीय कलहही वाढत चालले आहेत. वाढत्या उष्णतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी नैसर्गिक वृक्षाच्छादनाचे, वाहत्या जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची नितांत गरज आहे. हवामानात उद्भवणाऱ्या परिवर्तनाचा कानोसा घेऊन, आम्ही प्राधान्यक्रमाने त्याला सामोरे जाण्याची सिद्धता केली नाही तर त्याचे दुष्परिणाम आमच्या अस्तित्वावर घाला घालतील.
गोव्यासारख्या राज्यात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याचा कालखंड स्थानिक जनतेलाही असह्य ठरत असून, वाढत्या उष्णतेच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकारी आणि सामाजिक स्तरावर गंभीरपणे पूर्वतयारी होत असल्याचे दिसत नाही. गोवा सरकार सातत्याने गोवा राज्यात देशाच्या तुलनेत जादा वृक्षांचे आवरण असल्याचे सांगत असून, सध्या रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्ग, विमानतळ आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीला वाव दिला जात आहे आणि त्यामुळे पर्यावरणीय असमतोल वाढत असल्याचे दिसत आहे. वाघेरीसारखे पर्वत शिखर असो अथवा 811 मीटर उंचीवरील सुरलासारखा गाव असो, आज पर्यावरणीय पर्यटनाचे प्रकल्प आणण्याच्या नावाखाली ही स्थळं संकटग्रस्त होण्याच्या वाटेवर आहेत. राज्याचे जलस्रोत मंत्री धरणांच्या जलाशयात मूबलक प्रमाणात पाण्याचा साठा असल्याचे सांगत असले तरी ग्रामीण आणि शहरी भागातल्या पिण्याच्या समस्येचे निराकरण करताना पाणीपुरवठा खात्याच्या नाकी नऊ दरवर्षी उन्हाळ्यात येत असतात. त्यातच जलस्त्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी दूरगामी उपाययोजना करण्याची मानसिकता विकलांग झालेली पाहायला मिळत आहे. वर्तमान आणि भविष्य जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदल यांच्या संकटाच्या गडद छायेखाली असून, त्याला सामोरे जाण्यासाठी सदाहरित वृक्षाच्छादन वृद्धिंगत करण्याची नितांत गरज आहे. वड, पिंपळ औदुंबर, नांदरुक यांसारख्या शतकोत्तर परंपरा असणाऱ्या वृक्षांचे रक्षण करण्यासाठी समाज आणि सरकार यांनी संयुक्त मोहीम हाती घेण्याची गरज आहे. वाढत्या तापमानाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आजपासून सुरू झाले तरच या संकटाची तीव्रता थोडीफार कमी होऊ शकते.