Home बातम्या ‘त्या’ ५० पाहुण्यांवर लाखो रुपये खर्च का केला?

‘त्या’ ५० पाहुण्यांवर लाखो रुपये खर्च का केला?

0

कॉंग्रेसचा मुख्यमंत्री पर्रीकरांना सवाल

गोव्यात तरंगता कॅसिनो आधी कोणत्या सरकारने आणला याला महत्त्व नाही. मांडवी नदीत कॅसिनो चालविणे हे अनैतिक आहे. पणजी मतदारसंघातील महिला आणि बालकांचा कॅसिनो जुगारास विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तरंगत्या कॅसिनोंना प्रोत्साहन देऊ नये, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस गोव्यात आलेल्या ५० पाहुण्यांवर राज्य पाहुणे म्हणून लाखो रुपये खर्च का केले याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणीही त्यांनी केली.
नव्या नियमानुसार गोमंतकीयांना तरंगत्या कॅसिनोंवर प्रवेश देणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करीत आहेत. कायद्याच्या चौकटीत हा प्रकार बसूच शकत नाही, असे ते म्हणाले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवेळी गोव्यात आलेल्या ५० पाहुण्यांवर राज्य पाहुणे म्हणून लाखो रुपये खर्च का केले, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी आता जनतेसमोर करावा, असे सांगून पंतप्रधानपदी आरूढ होण्याची स्वप्ने पहाणारे नरेंद्र मोदी यांची सुरुवातच भ्रष्टाचारातून झाल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस आलेले माजी मंत्री प्रसाद पटेल या एकमेव नेत्याने स्वतःचा खर्च केला होता. त्यामुळे ते आदर्श ठरले आहेत, असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी अमेरिकी दुतावासाला साकडे घालणे हे देशाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराकडून ही अपेक्षा नव्हती, असेही फर्नांडिस यांनी सांगितले. भाजपचे एक प्रवक्ते आपल्याला प्रशासकीय अनुभव नाही, अशी टीका करतात. कॉंग्रेसमध्ये असतानाही हे प्रवक्ते कॉंग्रेस बैठकांतील माहिती विरोधकांना पुरवित होते याची सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळे या प्रवक्त्याने आपल्याला शिकविण्याचा प्रयत्न करू नये, असे फर्नांडिस यांनी सांगितले.