‘त्या’ शिक्षकांना सेवेतकायम करणार : मुख्यमंत्री

0
44

गेल्या दहा वर्षांपासून राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांत तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना सेवेत कायम केले जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया येत्या 15 दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यानी त्यांना वरील आश्वासन दिले. या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करणारे वकील ॲड. अजय प्रभुगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तासिका तत्त्वावर उच्च माध्यमिक विद्यालयात काम करणाऱ्या एकाही शिक्षकाला सेवेतून काढले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे, तसेच दीर्घकाळापासून त्यांच्या अडून राहिलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी शिक्षण संचालकांना केली आहे. शिक्षकांनी आतापर्यंत आपण केलेल्या कामासंबंधीचे सगळे तपशील पुढील तीन दिवसांच्या आत देण्याची तयारी दर्शविली असून, त्यामुळे त्यांना सेवेत नियमित करण्याची सगळी प्रक्रिया येत्या निवडणुकांपूर्वी पूर्ण होऊ शकणार असल्याचे ॲड. प्रभुगावकर यांनी स्पष्ट केले.