भाजपात पंतप्रधानपदासाठी विश्वासार्ह असे नाव आपल्याला दिसत नाही असे शुक्रवारी वक्तव्य केलेल्या शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा दावा केला. काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी आपण शुक्रवारी केलेले वक्तव्य कॉंग्रेस राजवटीच्या संदर्भात केले होते असा खुलासा केला.
दिल्लीत लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज या नेत्यांना भेटून आल्यानंतर ठाकरे यांनी भाजपने आपल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबतचा निर्णय घेऊन त्यानंतर शिवसेना व अकाली दल या मित्रपक्षांशी चर्चा करावी असेही म्हटले होते. या पार्श्वभूमीवर काल त्यांनी या संदर्भात योग्य प्रक्रियेचा अवलंब केला जाईल असे मत व्यक्त केले. भाजपबरोबरील शिवसेनेची युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधारीत असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. एनडीएच्या निवडणूक प्रचार मोहीमेत राम मंदिराच्या मुद्द्याला मोठे महत्व नसेल. त्याऐवजी सर्वसामान्यांना भेडसावणार्या ज्वलंत समस्यांवर भर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे मते मिळवण्यासाठीचा कॉंग्रेसचा खटाटोप असल्याचा दावाही त्यांनी केला.