मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सीआर झेड कायद्याखाली आखाडा-कुंभारजुवे येथील रोहिदास नार्वेकर या मच्छीमाराचे घर काल सोमवार पाडणार असल्याने नार्वेकर यांची पत्नी व तीन मुलींनी आत्महत्या करीत असल्याचे पत्र घरात ठेवून बेपत्ता झाल्याचे एका दैनिकातील वृत्त वाचून काल संपूर्ण गोवा हादरला. सुदैवाने रात्री ती चौघेही सापडली व त्यांचे घरही काल पाडण्यात आले नाही. काल सकाळपासून राज्यात याच विषयावर चर्चा होती. कुंभारजुवें परिसरातील लोकांनी तसेच पोलिसांनीही शोधकाम सुरू केले होते. परंतु पत्नी सीमा नार्वेकर, कन्या साक्षी, साईरा व सोहनी ही सर्वजण सापडल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. काल त्यांचे घर पाडण्यात न आल्याचे सांगण्यात आले. सीआर झेड कायद्यामुळे किनार्यावरील अनेक मच्छीमारांची घरे धोक्यात आली आहेत. या घरांना संरक्षण देण्यासाठी सीआर झेड कायद्यात दुरुस्ती आणण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने अभ्यास सुरू केल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.

