बिहारी तरुणास अटक
केपे येथून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालिकेवर प्रथम बलात्कार करून नंतर गळा आवळून व तोंड दाबून खून करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणी केपे पोलिसांनी काल अटक केलेल्या दिपक गणेश राय (वय २१) बेगुळसराय, बिहार याने आपण बलात्कार करून खून केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी केली असता त्यानेच बलात्कार केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
आरोपी राय याने केपे पोलिसांना दिलेल्या जबानीत खेळत असलेल्या बालिकेला आपण फुस लावून इमारतीमध्ये नेले व तेथेच आपण तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केला व तिला इमारतीच्या लिफ्टच्या ट्युबमध्ये फेकून दिले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याही परिस्थित त्या बालिकेने प्रतिकार केला होता त्यावेळी आरोपी राय यांच्या अंगाला बरेच खरचटले होते.
केपे पोलिसांनी आरोपीवर भादंसंच्या ३७६, ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक अरविंद गांवस, उपअधीक्षक महेश गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष देसाई अधिक तपास करीत आहेत.