‘त्या’ बार ऍण्ड रेस्टॉरंटसमोर युवक कॉंग्रेसची निदर्शने

0
16

केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येच्या आसगाव येथील कथित सिली सोल्स या बेकायदा बार ऍण्ड रेस्टॉरंटचा विषय गाजत आहे. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कथित बार ऍण्ड रेस्टॉरंटच्या समोर काल निदर्शने करून रेस्टॉरंटला टाळे ठोकण्याची मागणी करून पोलिसांकडे कुलूप सुपूर्द केले.
सदर रेस्टॉरंट चर्चेला विषय बनलेला आहे. रेस्टॉरंटच्या मद्यविक्रीप्रकरणी ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांनी अबकारी खात्याकडे तक्रार दाखल केली आहे.

आसगाव येथे रेस्टॉरंटजवळ महिला कॉंग्रेसने शनिवारी निदर्शने केली होती. तर, युवक कॉंग्रेसने रविवारी निदर्शने करून याप्रकरणी कसून चौकशीची मागणी केली आहे. सदर रेस्टॉरंट सील करण्याची मागणी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. हे रेस्टॉरंट स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयाचे असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्यामुळे याप्रकरणी सत्य जनतेसमोर येण्याची गरज आहे, असे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या १८ वर्षीय कन्येवर करण्यात आलेल्या आरोप प्रकरणी कॉंग्रेसचे नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसोझा आणि कॉंग्रेस पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. कॉंग्रेस नेत्यांनी कन्येवरील आरोप मागे घेऊन लेखी बिनशर्त माफी मागावी, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.