‘त्या’ प्रश्‍नी लवकरच कारवाई शक्य

0
189

>> शालांत मंडळाध्यक्ष सामंत यांची स्पष्टोक्ती

दहावी इयत्तेच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेतील वादग्रस्त ठरलेल्या प्रश्‍नासंबंधी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे काल गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी स्पष्ट केेले. कुणावरही एका दिवसात कारवाई होऊ शकत नाही. आम्हाला चौकशी करण्यास वेळ हवा आहे. शालांत मंडळाच्या अधिकार्‍यांशी मी सध्या याप्रकरणी चर्चा सुरु केलेली आहे. त्यांचे यासंबंधी काय म्हणणे आहे ते मी ऐकून घेत आहे. या वादग्रस्त प्रश्‍नासाठी जो कोण व्यक्ती जबाबदारी आहे त्याच्यावर निश्‍चितच कारवाई होईल. पुढील एक-दोन दिवसांत संबंधित व्यक्तीवर कारवाई होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

बोर्डाच्या परीक्षेची प्रश्‍नपत्रिका कित्येक जणांच्या नजरेखालून जाते असा जो सर्वसामान्यांचा समज आहे तो चुकीचा असल्याचे सांगून ‘पेपर सेटर’ व ‘चीफ पेपर सेटर’ अशा दोनच व्यक्तींच्या नजरेखालून हा पेपर जात असतो. पेपरच्या प्रश्‍नपत्रिका ह्या खूप गुप्त ठेवाव्या लागतात. पेपर फुटू नये यासाठी ती काळजी घेतली जात असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून मंडळाला
सूचना : सावईकर
दरम्यान दहावी इयत्तेच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेतील वादग्रस्त ठरलेल्या प्रश्‍नासंबंधी चौकशी करण्यात येणार असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा शालांत मंडळाने त्यासंबंधी योग्य ती पावले उचलावीत, अशी सूचना मंडळाला केली असल्याचे काल भाजप प्रवक्ते नरेंद्र सावईकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘तो’ प्रश्‍न खरोखरच आक्षेपार्ह असून त्यासंबंधी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केल्याचे सावईकर म्हणाले. ज्या कोणी हा वादग्रस्त प्रश्‍न तयार करुन त्याचा प्रश्‍नपत्रिकेत समावेश केला त्या व्यक्तीवर तसेच या प्रश्‍नपत्रिकेची जबाबदारी अन्य ज्या व्यक्तींवर होती त्या सर्वांवर योग्य ती कारवाई करावी, अशी सूचना सावंत यांनी गोवा शालांत मंडळाला केली असल्याची माहिती त्यांनी दिली.